राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सांगलीसह सोलापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नुकताच केलेला दोन दिवसांचा दौरा हा नेमका पक्ष बांधणीसाठी होता, की गटबांधणीसाठी होता अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आ. जयंत पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याच्या वाट्याला आलेले आहे. मात्र, आ. पाटील खा. सुळे यांच्या पूर्ण दौऱ्यामध्ये केवळ दोनच कार्यक्रमांना उपस्थित होते. तर शहरातील पक्षाच्या सर्वच नगरसेवकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता काही ठरावीकच नगरसेवकांनी ताईंच्या भेटीसाठी विश्रामधाम गाठले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास 

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षात कमालीचा अस्वस्थपणा दिसत आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पध्दतीने भाजपकडून सत्तांतराच्या तारखा जाहीर करण्यात येत होत्या, त्याच पध्दतीने आता शिंदे सरकारचे भवितव्यही अनिश्चित असल्याचे सांगितले जात असून केव्हाही निवडणुका जाहीर होऊ शकतात या निष्कर्षाप्रत राजकीय पक्ष आले आहेत. शिवसेनेतील शिंदे गट असो वा भाजप यांचीही निवडणुकीची तयारी सध्या सुरू असून यासाठी पक्ष प्रवेशासाठी सर्वच पक्षांची दारे खुली ठेवण्यात आली आहेत. सत्ता हाती असल्याने भाजप जिल्ह्यात पुन्हा मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. यामध्ये राष्ट्रवादीमधूनही मोठी गळती होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. जर तशी शक्यता असेल तर त्याला पायबंद घालण्यासाठी तर त्यांचा हा दौरा नव्हता ना, अशीही चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा- राष्ट्रवादी वगळून शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार

या पार्श्वभूमीवर खा. सुळे यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही, मात्र, विरोधी पक्ष नेते होण्याची इच्छा डावलल्याने नाराज झालेल्या जयंत पाटील यांना भाषणाची संधी देण्यात आली. खा. सुळे यांचा कुंडल येथे आ. अरूण लाड यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये आ. पाटील उपस्थित नव्हते. त्यांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपूरमध्ये केवळ एकमेव कार्यक्रम घेण्यात आला. ताईंच्याकडे भरपूर वेळ असतानाही सांगलीमध्ये महापालिका ताब्यात असताना एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला गेला नाही. जयंत पाटील खा. सुळेंच्या केवळ दोन कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. महापालिका नगरसेवकांनी देखील त्यांच्या बैठकीकडे फिरवलेली पाठ या साऱ्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर खा. सुळे यांच्या दौऱ्यामागे पक्ष बांधणीपेक्षा गटबांधणीचा हेतू होता का, अशी कुजबूज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Group politics during ncp leader supriya sules west maharashtra tour dpj
First published on: 09-10-2022 at 10:25 IST