लातूर : देशाला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून १३ महिन्याने मुक्त झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास लातूरच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. पालकमंत्री गिरीश महाजन आलेच नाहीत. का, असे त्यांना कोण विचारणार ?, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देखमुख ही ध्वजारोहणास आले नाहीत. नव्याने निवडून आलेले खासदार डॉ. शिवाजी काळगे हेही गायबच होते. शासकीय ध्वजारोहणाला एकाही पक्षाचा लोकप्रतिनिधी उपस्थित राहिला नाही त्यामुळे ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रशासनाने पार पाडला. मराठवाडा मुक्तीदिनी शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा >>> Row Over Marathwada Package : मराठवाडा पॅकेजमधील योजनांच्या अंमलबजावणीवरुन सत्ताधाऱ्यांची कोंडी

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या अडीच वर्षात एकाही ध्वजारोहण समारंभाला उपस्थित नव्हते. त्यांच्याकडे चार जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांनी किमान एकदा तरी ध्वजारोहणाला उपस्थित रहायला हवे होते, असा सूर उमटू लागला आहे. आमदार अमित देशमुख , आमदार धीरज देशमुख हे दोघेही बंधू मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण समारंभास उपस्थित नव्हते. पूर्वीचा अनुभव असाच असल्याचे सांगण्यात येते.लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचे वडील बंडाप्पा काळगे हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर व लातूरमध्ये असून मुख्य ध्वजारोहण काळगे यांनी दांडीच मारली. काँग्रेस ,भाजपा ,शिवसेना शिंदे , ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार व अजित दादा अशा प्रमुख सहा पक्षाचे नेते या समारंभाला उपस्थित नव्हते. प्रशासनाने प्रशासनासाठीच केलेला उपक्रम असे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाचे स्वरूप दुर्दैवाने निर्माण झाले होते. मराठवाड्याची उपेक्षा केली जाते म्हणून कायम आरडाओरड करणाऱ्या राजकारण्यांना स्वामी रामानंद तीर्थांना अभिवादन करण्यासही वेळ नसल्याने संतप्त लातूरकर ‘ एवढं काय काम करत्येत हो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत होते.