गुजरात विधानसा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून येथे राजकीय घडमोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या चाचपणी प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मागील तीन दशकांपासून भाजपामध्ये असलेले तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भुषवलेले जय नारायण व्यास यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. ते काँग्रेस किंवा आप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Gujarat Assembly Elections 2022 : “मी राजकारणात छंद म्हणून नाही, तर मजबुरी म्हणून प्रवेश करतोय, कारण मी…”

जय नारायण व्यास मागील ३० वर्षांपासून भाजपात होते. या काळात त्यांना मोदी तसेच केशुभाई पटेल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळले होते. मात्र पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याची शक्यता बळावताच त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आगामी काळात गुजरात किंवा आप पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय नारायण व्यास हे उच्चशिक्षि आहेत. त्यांनी आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतलेलेआहे. अर्थशास्त्राचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देताना कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. राजीनाम्यात त्यांनी वैयक्तिक कारणामुळे मी राजीना देत आहे, असे लिहिलेले आहे.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये फेब्रुवारी महिन्यात पुन्हा ‘खेला होबे’

व्यास यांनी १९९८ आणि २००० साली पाटण जिल्ह्यातील सिधपूर विधानसभा मतदासंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. यावेळी त्यांना याच जागेवरून निवडणूक लढवायची आहे. मात्र २००२, २०१२, २०१७ साली त्यांना या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. २००२ आणि २०१७ याच मतदारसंघातून बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेसच्या तिकिटावर व्यास यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे राजपूत आता भाजपात आहेत.

हेही वाचा >>> राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार?

दरम्यान, व्यास यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्यास पक्षावर नाराज नव्हते. दोन वेळा पराभूत होऊनही त्यांना पक्षाने तिकीट दिले होते. त्यांनी मंत्री म्हणून काम केलेले आहे. ते एक प्रभावशाली नेते आहेत. मात्र वयाचे ७५ वर्षे झाल्यानंतर भाजपातर्फे त्यांना तिकीट दिले जाणार नाही, याची त्यांना भीती असावी, असे पाटील म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat assembly election 2022 jay narayan vyas quits bjp may join aap or congress prd
First published on: 05-11-2022 at 19:59 IST