‘ऑपरेशन सिंदूर’वरील कथित आक्षेपार्ह पोस्टनंतर गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटी (GPCC) चे सरचिटणीस राजेश सोनी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी राज्याच्या सायबर सेलने अटक केली आहे. त्यांना काँग्रेसमधील अनेक जण पक्षाच्या प्रसिद्धीशी संबंधित कामांसाठी ओळखतात. पक्षाच्या किमान तीन वरिष्ठ नेत्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त होर्डिंग्ज लावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल दिशाभूल करणारा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नेमकी ही पोस्ट काय होती? कोण आहेत राजेश सोनी? जाणून घेऊयात.

आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक

राजेश सोनी यांना शुक्रवारी गुजरात राज्य सायबर क्राइम सेलने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम १५२ (भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणे) आणि ३५३ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने करणे, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) या गुन्ह्यांअंतर्गत अटक केली आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, त्यांच्या सोशल मीडिया हँडल आणि पेजवर सेनेचे मानसिक खच्चीकरण करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.

राजेश सोनी यांच्या सोशल मीडिया हँडल आणि पेजवर सेनेचे मानसिक खच्चीकरण करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कोण आहेत राजेश सोनी?

  • मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) असणारे राजेश सोनी २०१५ मध्ये त्यांच्या काही समर्थकांसह काँग्रेसमध्ये सामील झाले.
  • पक्षात सामील झाल्यानंतर अवघ्या काही वर्षांत त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) प्रतिनिधी करण्यात आले.
  • इतर वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत त्यांना लवकर पदोन्नती मिळाली, असे अहमदाबाद शहरातील एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
  • माजी खासदार जगदीश ठाकोर हे प्रदेश पक्षाध्यक्ष असताना २०२२ मध्ये राजेश सोनी यांना राज्य युनिटचे सरचिटणीस करण्यात आले.

जगदीश ठाकोर यांनी सोनी यांचे वर्णन दानधर्म करणारे आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे म्हणून केले. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमित नायक यांनी राजेश सोनी कोविड-१९ साथीच्या काळात सामुदायिक स्वयंपाकघर चालवत असल्याचीदेखील आठवण करून दिली. २०१५ ते २०१८ पर्यंत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष असलेले माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “सोनी दरवर्षी मुलांना नोटबुक वाटण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करतात. यंदाच्या कार्यक्रमात त्यांनी मला आमंत्रित केले. मी त्यांना टॅब वाटण्याचा सल्ला दिला. त्यांनी हा सल्ला मान्य केला आणि पाच मुलांना टॅब वाटप केले.”

सोनी यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे सांगितले. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमित नायक म्हणाले, “सोनी यांना लक्ष्य केले जात आहे, कारण ते एक कट्टर नेते आहेत आणि ते पूर्वी पक्षाच्या आयटी सेलचे प्रभारी होते. ते पक्षाच्या टीव्ही वादविवाद संघाचादेखील एक भाग आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने भाजपा सरकारला नक्कीच त्रास झाला असेल,” असे त्यांनी म्हटले. २०२३ मध्ये त्यांच्या सोशल मीडिया पोस्टसाठी त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहितीही नायक यांनी दिली.

ते म्हणाले, “आम्ही निर्णय घेतला आहे की, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते राजेश सोनी यांची (कथित आक्षेपार्ह) पोस्ट पुन्हा पोस्ट करतील आणि नंतर त्यांना अटक करावी म्हणून पोलिस महासंचालक (डीजीपी) कार्यालयात जातील.” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (सीएलपी) नेते अमित चावडा यांच्यासारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी सोनी यांच्यावरील कारवाईवर टीका केली आहे. त्यांना तात्काळ जामीन देण्यात यावा, अशी मागणीही जोर धरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तीसिंह गोहिल यांनी शुक्रवारी सांगितले की, गांधीनगर पोलिसांच्या सायबर क्राईम टीमने सोनी यांना दहशतवादी असल्यासारखी अटक केली. ते म्हणाले की, सोनी यांची पोस्ट सैनिकांना त्यांच्या शौर्याचे श्रेय देण्याबद्दल, सार्वजनिक तिजोरीतील पैसे प्रसिद्धीसाठी वापरता कामा नये त्याबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली राजकीय लाभ घेऊ नयेत या विषयांबाबत होती.