नाशिक – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने १९८६ मधील महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब बर्डे यांना रिंगणात उतरवले आहे. यानिमित्ताने वंचित आघाडीने दुर्लक्षित भिल्ल समाजाला प्रथमच उमेदवारी देत न्याय दिल्याची भावना बर्डे यांनी व्यक्त केली. दिंडोरी या आदिवासी राखीव मतदारसंघात भिल्ल समाजाच्या मतदारांची मोठी संख्या आहे. मागील निवडणुकीत वंचितला ५८ हजार ८४७ (५.२ टक्के) मते मिळाली होती. महाराष्ट्र केसरी पहिलवानाला संधी देऊन वंचितने दिंडोरीतील महायुती विरुद्ध मविआ लढतीत रंग भरला आहे.

कृषिबहुल दिंडोरीच्या जागेवर महायुतीने भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे या शिक्षकाला उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने बर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गुलाब बर्डे हे १९८६ मधील महाराष्ट्र केसरी आहेत. शिवसेनेचे राहुरी तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. राहुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले होते. एकलव्य भिल्ल समाज संघटनेत ते २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. या संघटनेचे उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. दोन वर्षांपासून ते वंचित बहुजन आघाडीप्रणित एकलव्य आघाडीच्या माध्यमातून काम करीत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या भागातून सातत्याने फोन येत आहेत. भिल्ल समाजाचा एवढा मानसन्मान करण्याचा विचार कुणी केला नव्हता. वंचित आघाडीने उमेदवारी देऊन तो विचार केला, मानसन्मान दिला, अशी प्रतिक्रिया बर्डे यांनी व्यक्त केली. भिल्ल समाजातील व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भिल्ल समाजाचे चार ते साडेचार लाख मतदार आहेत. पक्षाने उमेदवारी देऊन समाजाला न्याय दिला’ असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – “यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा

हेही वाचा – मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?

इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण झालेले बर्डे हे राहुरी भागातील शाळांमध्ये कुस्तीचे धडे देतात. त्यांच्याकडे कुस्ती शिकण्यासाठी येणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांत आयोजित कुस्ती स्पर्धा त्यांनी गाजविल्या आहेत. एकलव्य संघटनेच्या कामाच्या निमित्ताने दिंडोरीत आपले येणे-जाणे होते, असे त्यांनी नमूद केले. बर्डे यांच्या उमेदवारीने दिंडोरीची लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.