दीपक महाले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीकाळी पान टपरी सांभाळणारा एक सामान्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनामय होऊन जातो काय आणि एकदा नव्हे तर, तिसऱ्यांदा मंत्री होतो काय, सारे काही स्वप्नवत. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील यांच्या बाबतीत हा स्वप्नवत प्रवास वास्तवात आला आहे.

गुलाबराव पाटील यांचा राजकीय प्रवास खूपच रंजक आहे. गुलाबराव हे खानदेशी बोलीतील आक्रमक भाषणांसाठी प्रसिध्द आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे. आपल्या बहुतेक भाषणांत आपण पानटपरीवाला होतो, याचा ते जाणीवपूर्वक उल्लेख करतात. पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवले, असे ते आवर्जून सांगतात. गुलाबराव हे जळगावपासून अवघ्या बारा किलोमीटरवरील धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावात पानटपरी सांभाळत. या पानटपरीचे नाव ‘नशीब’ असे होते. तरुण वयात गुलाबराव शिवसेनेच्या संपर्कात आले. कट्टर शिवसैनिक झाले. गुलाबरावांनी गरिबी नुसती पाहिली नाही तर, अनुभवली आहे. पोटाची आग विझविण्यासाठी त्यांनी ऐन उमेदीत तमाशातही काम केले. गरिबीची जाणीव असल्यानेच आजही ते लोकांच्या मदतीला धावून जातात. त्यांचे गावातील कार्यालय नेहमी गजबजलेले असते.

गुलाबरावांची आंदोलने आगळीवेगळीच राहिली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्‍नावर त्यांनी शिंगाडे मोर्चा काढला होता. या आंदोलनामुळे ते अधिकच लोकप्रिय झाले. गावरान भाषणांनी ते सभा गाजवू लागले. हा फर्डा वक्ता अल्पावधीतच शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला. पाळधी ग्रामपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि थेट विधानसभा, अशी त्यांनी मजल मारली. जळगाव जिल्हा तसा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपचा प्रभाव असणाऱ्या या जिल्ह्यात गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले; पण २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी त्यांचा पराभव केला, २०१४ च्या निवडणुकीत देवकर हे जळगाव घरकुल गैरव्यवहारात अडकल्याने गुलाबराव पाटील तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजप-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप नेत्यांची जिल्ह्यातील मक्तेदारी आपोआप मोडीत निघाली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचे जळगावमधील महत्त्व अधिकच वाढले. जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुलाबरावांनी त्यांना साथ दिली. त्याचे बक्षीस गुलाबरावांना मंत्रीपदाच्या रुपाने मिळाले आहे.

गुलाबरावांची पत्नी मायाबाई या गृहिणी आहेत. गुलाबरावांना एक मुलगी, दोन मुलगे आहेत. एक मुलगा जिल्हा परिषद सदस्य तर, दुसरा सध्यातरी राजकारणापासून दूर आहे. मंत्रीपदाचा उपयोग करुन जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाची पाळेमुळे रुजविण्याचे आव्हान आता गुलाबरावांसमोर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gulabrao patil is the aggressive face of eknath shindes cabinet from north maharashtra print politics news pkd
First published on: 09-08-2022 at 21:08 IST