दिगंबर शिंदे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन अडीच वर्षांचा काळ झाला असला, तरी सत्तेवर असलेल्या तीनही पक्षांतील अनेक नेत्यांना आजही या सत्तेबद्दल आश्चर्य वाटत आहे. राज्यात मिळालेली सत्ता खरीच आहे का? ती टिकेल का? या विषयीची भावना नेत्यांकडून अनेकदा खासगीत व्यक्त केली जाते. याचेच प्रत्यंतर सांगलीत नुकतेच शिवसेना आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या जाहीर वक्तव्यातून आले. यातील एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील तर दुसरे कॉँग्रेसचे नेते आणि कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे आहेत. पहिला कार्यक्रम पलूस तालुक्यातील आमणापूर येथे झाला. येथे एका विकासकामाचे उद्घाटन करताना मंत्री विश्वजित कदम हे भाषण करताना खुलत गेले आणि स्वप्नातही न पाहिलेल्या सत्तेचे गुपित त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की २०१९ चा निकाल लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीला ज्या जागा मिळाल्या त्यानुसार आम्ही विरोधी बाकावर बसण्याची मानसिकताही केली होती. पण अचानक काय झाले आणि राज्याच्या राजकारणात एक वादळ शिरले. सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिनसले. याच वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले. त्यांनी मनावर घेतले आणि कधी स्वप्नातही वाटले नव्हते असे पक्ष एकत्र आले. जिथे पाच वर्षे विरोधी बाकावर उपेक्षित राहावे लागणार वाटत होते, तिथेच मंत्रिपद चालून आले. हे सारे आठवले की आजही खरे वाटत नाही. हे सांगताना उपस्थितांसह विश्वजित कदमही हसण्यात बुडालेले होते. शेकाप आमदार जयंत पाटील यांचा राग पुन्हा अनावर, पोलीस अधिकाऱ्याला प्रोटोकॉल सांगत खुर्चीतून उठवले मंत्री कदम यांनी सत्तेच्या लॉटरीची ही कथा सांगितली असताना त्याच वेळी याच सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी अचानक तयार झालेल्या सत्तेच्या चित्रात आणखी रंग भरले. पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, की निवडणुकीत भाजप-शिवसेना युती विजयी झाली हे खरे. ती सत्तेत येऊ शकली नाही याचेही दु:ख आहे. पण आमच्या पक्षात नेतृत्व सांगेल ती दिशा असते. मी केवळ डब्बा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. ते जिथे सांगतील तिथे मी जाणार. शिवसेनेचा प्रामाणिक नेता म्हणून पक्षाचे ऐकणे आणि पक्षासाठी काम करणे हे माझे कर्तव्य असल्याचे सांगताना त्यांनाही चेहऱ्यावरचे हसू लपवता आले नाही. राज्यात बलाढ्य भाजपला दूर करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या या सत्तेबद्दल सामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सारेच आजही आश्चर्यात आहेत. त्याच्या अस्तित्वाबद्दल साशंक आहेत. मात्र या राजकीय घटनेचा धक्का सत्तेतील मंत्र्यांना देखील आजही किती वाटतोय याचाच साक्षात्कार घडवणारी ही वक्तव्ये होती. एकाच जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांकडून ओघवत्या संवादातून बाहेर आलेल्या या दोन-चार ओळींनी राजकीय चर्चा फुलवली!