सोलापूर/नांदेड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून, समाजातील कार्यकर्ते राजकीय नेत्यांना जाब विचारताना दिसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवारांना अगोदर कुर्डुवाडीजवळ या आंदोलकांनी अडवले. या वेळी त्यांना मराठा आरक्षणची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर बार्शीत शेतकरी संवाद मेळाव्यातही पवार हे भाषण करीत असताना या प्रश्नावर आंदोलकांकडून पवारांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. याच वेळी एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा सारा घटनाक्रम पाहता मराठा आरक्षण प्रश्नावर आता पवार यांनाही रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. हेही वाचा >>>Raj Thackeray : राज ठाकरेंवर भूमिका बदलाची टीका का होते? मनसेच्या स्थापनेपासून त्यांनी घेतलेल्या भूमिका कोणत्या? माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना शनिवारी रात्री त्यांच्याच मतदारसंघातील मुगट येथे आक्रमक मराठा समाजाने जाब विचारत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. तर रविवारी नांदेड येथे आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत तुमची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्यास सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही निवेदन देताना घोषणाबाजी केल्याचे पहावयास मिळाले.