Haryana Assembly Election : भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत विरोधकांना फायदाही झाला. त्यानंतर इंडिया आघाडी वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीतही एकत्र निवडणुका लढेल, असं बोललं जात होतं. मात्र, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. कारण आम आदमी पक्षाने आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे हरियाणात आम आदमी पार्टीने ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याचं बोललं जात आहे.

‘आप’ने सोमवारी (९ सप्टेंबर) हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवार जाहीर केले. एवढंच नाही तर हरियाणामध्ये ५० जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. आम आदमी पार्टीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यामुळे नेमकी कोणाला फटका बसणार? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आप’ने जाहीर केलेले २० उमेदवार कोण आहेत? आणि कोणत्या २० मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत? याविषयी जाणून घेऊयात…

हेही वाचा : Haryana Assembly Election: हरियाणामध्ये काँग्रेस-आप आघाडीचं घोडं कुठं अडलं? इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरती?

आम आदमी पार्टीने २०१९ च्या निवडणुकीत १२ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, ‘आप’ला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. एवढंच नाही तर त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. यामध्ये भिवानी, रानिया, डबवली, उचाना कलान, असंध, कलायत, बदली, महेंद्रगड, सोहना, बल्लभगड आणि बेरीचा यांचा समावेश होता.

आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या नारायणगड, असंध, उचाना कलान, समलखा, मेहम, बादशाहपूर, रोहतक, बदली, बेरी, महेंद्रगड, डबवाली आणि बहादूरगड यासह १२ जागांवर काँग्रेसने आधीच उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने आधीच जवळपास ४१ उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, ‘आप’ने जाहीर केलेल्या २० जागांपैकी सध्या काँग्रेसकडे नऊ, भाजपाकडे सहा आणि ‘जेजेपी’कडे दोन, तर चार जागांवर अपक्ष आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने राज्यात एकूण ४६ जागा लढवल्या होत्या. मात्र, ‘आप’ला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

हेही वाचा : TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

दरम्यान, आप आदमी पक्षाने हरियाणात जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे हरियाणा निवडणुकीत काँग्रेसबरोबर असलेल्या आघाडीचं भवितव्य जवळपास संपुष्टात आलं आहे. याचा परिणाम दिल्ली विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. आप आदमी पक्षाने आपले २० उमेदवार जाहीर करण्यापूर्वी पक्षाच्या हरियाणा युनिटचे अध्यक्ष सुशील गुप्ता यांनी सांगितलं की, “आमची ९० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. काँग्रेसकडून आघाडीबाबत अद्याप कोणताही शब्द आम्हाला मिळाला नाही. तसेच आम्ही सर्व ९० जागांसाठी उमेदवार जाहीर करू.”

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, “आता असं दिसत आहे की, “दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील. आपने अनेक जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. जिथे आम्ही आमचे उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. त्यामुळे आता आघाडी होण्याची शक्यता आहे, असं मला वाटत नाही.” तसेच हरियाणामधील एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं की, “आम आदमी पक्षाने सुरुवातीला १५ जागांची मागणी केली होती. त्यानंतर ते १० जागांपर्यंत आले होते. मात्र, आमच्या नेतृत्वाने ‘आप’ला तीन ते चार जागा देण्यास तयार होते.”

‘आप’ने २०१९ च्या निवडणुकीत कुठे उमेदवार दिले होते?

मेहम :

२०१९ मध्ये अपक्ष उमेदवार बलराज कुंडू यांनी ही जागा जिंकली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार आनंदसिंग डांगी, ज्यांनी यापूर्वी २००५ , २००९ आणि २०१४ मध्ये ही जागा जिंकली होती. ते दुसऱ्या स्थानावर होते. यावेळी काँग्रेसने डांगी यांचे पुत्र बलराम डांगी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत ‘आप’ने ही जागा लढवली नव्हती.

भिवानी :

भाजपाचे घनश्याम सराफ यांनी २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा ही जागा जिंकली होती. जेजेपीचे शिवशंकर दुसऱ्या तर काँग्रेसचे अमरसिंह तिसऱ्या क्रमांकावर होते. ‘आप’चे कुलदीप सिंग ११ व्या क्रमांकावर राहिले होते.

रानिया :

रणजीत सिंह चौटाला यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून हरियाणा लोकहित पक्षाच्या गोविंद कांडा यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. भाजपाचे रामचंद कंबोज तिसऱ्या तर काँग्रेसचे उमेदवार विनीत कंबोज पाचव्या स्थानावर होते. ‘आप’चे अमरजीत सिंग आठव्या स्थानावर होते.

डबवली

काँग्रेसचे उमेदवार अमित सिहाग यांनी २०१९ मध्ये डबवली मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आदित्य चौटाला यांचा पराभव केला. ‘आप’चे मलकीत सिंग सातव्या स्थानावर होते. काँग्रेसने यावेळी अमित सिहाग यांना उमेदवारी दिली, तर जेजेपीने त्यांचे नेते दुष्यंत चौटाला यांचे धाकटे भाऊ दिग्विजय चौटाला यांना उमेदवारी दिली आहे.

उचाना कलान

२०१९ मध्ये दुष्यंत चौटाला यांनी ही जागा जिंकली होती, तर भाजपाच्या तत्कालीन उमेदवार प्रेम लता दुसऱ्या स्थानावर होत्या आणि काँग्रेसचे बाळ राम पाचव्या स्थानावर होते. ‘आप’चे रोहताश सहाव्या स्थानावर राहिले होते.

समलखा

मागील निवडणुकीत या जागेवर काँग्रेसचे धरमसिंह छोकर विजयी झाले होते, तर भाजपाचे शशीकांत कौशिक यांचा पराभव झाला होता. ही जागा ‘आप’ने २०१९ मध्ये लढवली नव्हती.