काँग्रेस आणि त्यांचे बंडखोर आमदार कुलदीप बिष्णोई यांच्यातील वाकयुद्ध अधिकच चिघळत चालले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर बिष्णोई यांनी पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसने त्यांना पक्षातील सर्व पदांवरून काढून टाकले होते. पक्षाने केलेल्या कारवाईनंतर बिष्णोई यांनी पक्षातील प्रतिस्पर्धी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवत त्यांना जाहीर उत्तर देण्यास सुरवात केली आहे. ‘द इंडियन एक्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत बिष्णोई यांनी भुपेंद्रसिंग हुड्डा यांचे निकटवर्तीय उदय भान यांची हरियाणा काँग्रेस अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही एक ‘आपत्ती’ असल्याचे म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देत उदय भान म्हणाले की ” जे त्यांच्या मतांची कदर करत नाहीत त्यांना मतदार थप्पड मारतात. आता २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणाला थप्पड मिळते ते आपण पाहू” . हरियाणा प्रदेशाध्यक्ष पदी उदय भान यांची निवड झाल्यापासून बिष्णोई नाराज होते.

कार्यध्यक्षपदासाठीसुद्धा त्यांचा विचार करण्यात आला नाही. ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख त्यांनी दबावाखाली निर्णय घेणारा अलिप्त नेता असा केला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार यांना मत न देता भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांना मतदान केल्याबद्दल बिष्णोई यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई होऊन दहा दिवस उलटून गेले तरी अजूनही बिष्णोई यांनी त्यांची अंतिम भूमिका स्पष्ट केलेली नाही. बिष्णोई भाजपात प्रवेश करणार असा अंदाज बांधला जात असतानाच बिष्णोई यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचे वडील भजनलाल यांचे राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबतचे पोस्ट केले आहे. या पोस्टमुळे अजून संभ्रम निर्माण झाला आहे.

याबाबत बिष्णोई यांच्या निकटवर्तीयांनी संगितले की ” बिष्णोई यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सध्या ते भाजपा आणि आम आदमी पार्टी हे दोन्ही पर्याय चाचपडून पाहत आहेत. राजकीय परंपरेसोबतच ते दोन वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत तर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हुड्डा यांनी अलीकडेच बिष्णोई यांना राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले होते. हुड्डा यांच्या आव्हानाला उत्तर देताना बिष्णोई म्हणाले की ” हुड्डा यांनी हे लक्षात घ्यावे की भजनलाल यांच्या कुटुंबाने चार पोटनिवडणुका लढवल्या आणि जिंकल्यासुद्धा. या सर्व लढाया ह्या तत्कालीन सरकारच्या विरोधात होत्या. तेव्हा हुड्डा यांनी माझ्या विरुद्ध किंवा माझा मुलगा भव्य बिष्णोई याच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी”.