Haryana Election 2024 Bhupinder Singh Hooda : हरियाणा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (१२ सप्टेंबर) शेवटचा दिवस आहे. मुदतीचा शेवटचा दिवस उजाडला तरी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारांची नावं जाहीर करणं चालूच आहे. काँग्रेसने बुधवारी मध्यरात्री ४० उमेदवार जाहीर केले तर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास आणखी पाच नावं जाहीर केली. उर्वरित पाच उमेदवारांची नावं आज दुपारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यास काही तास शिल्लक असताना काँग्रेसने पाच उमेदवार जाहीर केले. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात त्यांना उमेदवार जाहीर करण्यास इतका उशीर कधीच झाला नव्हता. यामुळे हरियाणा काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालू होती. त्यामुळेच पक्षाला उमेदवार जाहीर करण्यास इतका विलंब झाला. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांनी सहा ते सात जागांवरील उमेदवारांच्या निवडीवर शेवटच्या क्षणी आक्षेप घेतले. त्यामुळे पक्षनेतृत्व देखील आश्यर्यचकित झालं होतं. त्यांच्यामुळेच उमेदवारांची नावं जाहीर करण्यास विलंब झाल्याचं सांगितलं जात आहे.
कलायत विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार श्वेता धुल यांच्या नावावर हुड्डा यांनी आक्षेप घेतला होता. हुड्डा यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेते व हिसारचे खासदार जय प्रकाश हे त्यांचे पुत्र विकास सहारन यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. हुड्डा यांनी त्यांची ताकद वापरल्यामुळे अखेरच्या क्षणी विकास सहारन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचं हरियाणा काँग्रेसमधील सूत्रांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.
हे ही वाचा >> Vinesh Phogat vs Kavita Dalal: विनेश फोगटच्या विरोधात उतरली सलवार सूटमधील कुस्तीपटू; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा विजय?
कोसली मतदारसंघात मोठी रस्सीखेच
कोसली मतदारसंघातून युवक काँग्रेसचे नेते राहुल राव यांना तिकीट दिलं जाणार होतं. मात्र हुड्डा यांच्या विरोधानंतर हे तिकीट माजी राज्यमंत्री जगदीश यादव यांना दिलं गेलं. यादव हे गेल्याच वर्षी भाजपातून काँग्रेसमध्ये आले आहेत.
अंबाला मतदारसंघात सहा वर्षांपासून संघर्ष
दुसऱ्या बाजूला, अंबाला शहर व अंबाला कॅन्टॉन्मेंट मतदारसंघामधून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं. हुड्डा यांचे निकवर्तीय मानले जाणारे निर्मल सिंह व त्यांची मुलगी चित्रा सरवरा हे दोघे अनुक्रमे अंबाला शहर व अंबाला कॅन्टॉन्मेंटमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. मात्र अंबाला लोकसभेच्या खासदार शैलजा यांनी या दोन्ही उमेदवाऱ्यांवर आक्षेप घेतला. अखेर सिंह यांना तिकीट मिळालं मात्र त्यांच्या मुलीला तिकीट दिलं गेलं नाही. अंबाला कॅन्टॉन्मेंटमधून परिमल पारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
२०१९ मध्ये देखील हुड्डा यांनी निर्मल सिंह यांना अंबाला शहरमधून विधानसभेचं तिकीट देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शैलजा यांच्या विरोधामुळे हुड्डा अपयशी झाले होते, असं काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेले निर्मण सिंह यांनी अंबालामधून अपक्ष निवडणूक लढवली. मात्र भाजपाच्या असीम गोयल यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर सिंह आम आदमी पार्टीत गेले होते. मात्र जानेवारी महिन्यात ते काँग्रेसमध्ये परतले. दुसऱ्या बाजूला चित्रा सरवरा यांनी २०१९ च्या विधानसभेला अंबाला कन्टॉन्मेंटमधून निवडणूक लढवली होती. त्या देखील पराभूत झाल्या होत्या. भाजपाचे अनिल विज यांनी सरवरा यांना पराभूत केलं होतं.