Savitri Jindal : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणात राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. हरियाणात भारतीय जनता पक्षाने आणि काँग्रेससह स्थानिक पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. काही पक्षांनी अनेक विद्यमान आमदारांना धक्का दिला आहे, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. असं असतानाच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी सत्ताधारी भाजपाच्या विरोधात बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणामधील हिस्सार विधानसभा मतदारसंघामधून सावित्री जिंदाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाने याच मतदारसंघातून आमदार कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदाल यांना ओळखलं जातं. त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या स्टील आणि पॉवर समूहाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचा मुलगा नवीन जिंदाल सध्या कुरुक्षेत्रातून भाजपाचे खासदार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला २४ मार्च रोजी नवीन जिंदाल यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातून लगेचच उमेदवारी दिली होती. तेथे याआधीही त्यांनी दोनदा प्रतिनिधित्व केलं होतं.

हेही वाचा : Bangladeshis marrying Jharkhand tribal women: बांगलादेशी नागरिक झारखंडच्या आदिवासी महिलांशी लग्न करतायत? भाजपाच्या दाव्याला केंद्रीय गृहखात्याची चपराक

त्यानंतर काही दिवसांनी सावित्री जिंदाल यांनीही हिसारमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत सावित्री जिंदाल यांनी हिसारमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. जिथे तिच्या कुटुंबाचा अनेक दशकांपासून प्रभाव आहे. मात्र, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला भाजपापासून दूर करत दावा केला की त्या अधिकृतपणे भाजपामध्ये सामील झाल्या नाहीत.

दरम्यान, सावित्री जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांनी तीन विधानसभा निवडणुकीत (१९९१, २००० आणि २००५) हिस्सारमधून विजय मिळवला होता. २००५ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा ते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीही होते. ओम प्रकाश जिंदाल यांच्या निधनानंतर सावित्री जिंदाल या सक्रिय राजकारणात आल्या. २००५ मध्ये त्यांनी हिस्सारमधून पोटनिवडणूक जिंकली आणि हुड्डा सरकारमध्ये त्यांना मंत्री करण्यात आलं. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी हिसारची जागा पुन्हा जिंकली त्यांना हुडा सरकारमध्ये मंत्री करण्यात आलं. तथापि २०१४ मध्ये हिसारमधून त्या निवडणूक हरल्या. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नव्हती.

काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांनी कुरुक्षेत्रात आपला मुलगा नवीन जिंदाल यांचा प्रचार केला होता. हिसार लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाचे उमेदवार रणजित सिंह चौटाला यांचा प्रचारही केला होता. आगामी निवडणुकीत हिसार विधानसभा मतदारसंघातून त्यांना पक्षाचे तिकीट मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. पण भाजपाने या जागेवरून दोन वेळा आमदार राहिलेल्या कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सावित्री जिंदाल यांचे कार्यकर्ते नाराज झाले आणि गेल्या गुरुवारी हिसार येथील जिंदाल हाऊसमध्ये मोठ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी सावित्री जिंदाल यांनी म्हटलं की, “हिसार हे माझे कुटुंब आहे. मला निवडणूक लढवायची आहे. मला कार्यकर्त्यांच्या इच्छेचे पालन करावे लागेल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत मी ही निवडणूक नक्कीच लढवणार आहे”, असं त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टिपथात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार

तसंच त्यांनी असंही म्हटलं की, “मी गेल्या २० वर्षांपासून जनतेमध्ये सेवा करत आहे. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला हिसारच्या जनतेची अपूर्ण कामे पूर्ण करायची आहेत.” दरम्यान, नवीन जिंदाल यांच्याबरोबर यासंदर्भात चर्चा केली का? असे विचारले असता त्यांनी म्हटलं की, “अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येकाला माहीत आहे की मी हो म्हटलं तर मी मागे हटत नाही. माझे हिसार कुटुंब मला जे सांगेल ते मी करेन. मी माझ्या लोकांच्या इच्छेचे पालन करेन”, असंही त्या म्हणाल्या. आपण निवडणूक लढवण्याबाबत कोणत्याही पक्षाशी चर्चा केली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, हिसारमध्ये कमल गुप्ता यांनी २०१४ च्या निवडणुकीत सावित्री जिंदाल यांचा पराभव केला होता. यावेळी ते कमल गुप्ता यांच्याशी कडवी झुंज देणार आहेत. कारण काँग्रेसने या जागेवरून राजकीयदृष्ट्या कमकुवत राम निवास रारा यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी सावित्री जिंदाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती किती?

दरम्यान, सावित्री जिंदाल यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात एकूण संपत्ती २७०.६६ कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे. २००९ च्या निवडणुकीसाठी त्यांनी आपली मालमत्ता ४३.६८ कोटी रुपये घोषित केली होती. २०१४ च्या निवडणुकीच्या नामांकनांमध्ये वाढून ११३ कोटी रुपये झाली. सावित्री जिंदाल या ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये इंडिया फोर्ब्सने त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये प्रथम स्थान दिले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana election indias richest woman savitri jindals revolt against bjp independents will contest the election after being denied the ticket gkt
Show comments