Does Exit Polls Really Proved True in Actual Results?: तब्बल १० वर्षांनंतर झालेल्या जम्मू-काश्मीरमधील निवडणुका व त्रिशंकू स्थितीनंतर सत्तेत आलेल्या सरकारमधील अनेक नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हरियाणा निवडणुका या सध्या देशभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमवीर या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हरियाणात भाजपा सत्ताधारी असून जम्मू-काश्मरीमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर भाजपाला सत्ताप्राप्तीची आशा आहे. पण मतदानानंतर आलेल्या एग्झिट पोलमध्ये अर्थात मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपासाठी फारसं काही आशादायी हाती लागलेलं नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणा व जम्मू-काश्मीर निकालांबाबतची उत्कंठा आता ताणली गेली असून येत्या ८ ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. खरे निकाल हाती येण्यासाठी अद्याप दोन दिवसांचा अवधी असला, तरी त्याआधी आलेल्या एग्झिट पोलच्या आकड्यांमुळे सत्ताधारी भाजपाच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या महिन्याभराच्या अंतराने होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरही या निकालांचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असताना भाजपासाठी हे निकाल म्हणजे सतर्कतेचा इशारा मानला जात आहे.

हरियाणाचा विचार करत २०१४ मध्ये एग्झिट पोल्सनं भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. तो बहुतांश खरा ठरला. पण २०१९ मध्ये मात्र एग्झिट पोल्स चुकले. भाजपाला पूर्ण बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला असताना हरियाणात त्या वर्षी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत एग्झिट पोल्सनं त्रिशंकू स्थितीचा अंदाज वर्तवला होता. पण त्यातही भाजपा, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस यांच्यापेक्षा पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीला जास्त जागा मिळतील असा अंदाज देण्यात आला होता.

हरियाणात नेमकं काय घडलं?

१० वर्षांपूर्वी हरियाणात आलेल्या भाजपा सरकारनं काँग्रेसचीही त्याआधीची १० वर्षांची कारकीर्द संपुष्टात आणून सत्ता मिळवली होती. आता १० वर्षांच्या भाजपाच्या सत्ताकाळानंतर काँग्रेसला एग्झिट पोल्सनं पुन्हा परतीची शक्यता असल्याचं नमूद केलं आहे. पण २०१४ मध्ये एग्झिट पोल्समध्ये नेमकं काय म्हटलं होत?

२०१४ मध्ये सरासरी चार एग्झिट पोल्सनं भाजपाला बहुमताच्या ४६ जागांपेक्षा फक्त ३ जागा कमी अर्थात ४३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. त्याचवेळी इंडियन नॅशनल लोकदल अर्थात INLD साठी २७ जागा तर काँग्रेसला १३ जागांचा अंदाज होता. प्रत्यक्षात भाजपाला ४७ जागा (बहुमतापेक्षा एक जास्त) तर काँग्रेसला १५ जागा मिळाल्या. आयएनएलडीला २७ऐवजी १९ जागा मिळाल्या. न्यूज २४-चाणक्य व एबीपी-नेल्सन यांनी मात्र तेव्हा भाजपाला बहुमत मिळेल हा वर्तवलेला अंदाज खरा ठरला.

२०१९ च्या निवडणुकीत गणित चुकलं!

२०१४ मध्ये जवळपास सर्वच एग्झिट पोल्सचे अंदाज खऱ्या निकालांच्या आसपास होते. पण २०१९ मध्ये मात्र त्यांचं गणित साफ चुकलं. त्या वर्षी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असेच सर्व पोल्सचे अंदाज होते. काहींनी तर भाजपाला ९० पैकी ७० जागा मिळतील असेही अंदाज वर्तवले होते. पण प्रत्यक्षात हरियाणात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली.

त्या वर्षी ८ एग्झिट पोल्सनं सरासरी भाजपाला ६१ जागांचा अंदाज वर्तवला होता. शिवाय काँग्रेसला १८ जागा मिळतील असं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात भाजपाला ४० जागा मिळाल्या, तर काँग्रेसला १८ च्या जागी तब्बल ३१ जागांवर विजय मिळाला. त्या वर्षी फक्त इंडिा टुडे-एक्सिसचा एग्झिट पोल खरा ठरला. या पोलनं भाजपाला ३२ ते ४४ जागा मिळतील व बहुमत मिळणार नाही असा अंदाज वर्तवला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ ला काय होती परिस्थिती?

जम्मू-काश्मीरमध्ये २०१९ ला निवडणुका झाल्याच नाहीत. पण २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सी-व्होटर एग्झिट पोलनं एकाही पक्षाला तेव्हाच्या ८७ आमदारांच्या विधानसभेत लागणारा ४४ हा बहुमताचा आकडा पार करता येणार नाही असा अंदाज वर्तवला होता. त्यात पीडीपीला ३२ ते ३८, भारतीय जनता पक्षाला २७ ते ३३, नॅशनल कॉन्फरन्सला ८ ते १४ जागा तर काँग्रेसला ४ ते १० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. प्रत्यक्षात पीडीपीला २८ जागा, भाजपाला २५, नॅशनल कॉन्फरन्सला १५ तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळवता आला.

Jammu-Kashmir Assembly Election 2024 Exit Poll : अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेचा कौल कुणाला? एक्झिट पोलचे आकडे आले समोर

यंदा काय म्हणतायत एग्झिट पोल्स?

या वर्षी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला फटका बसणार असल्याचा अंदाज एग्झिट पोल्समध्ये वर्तवण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर

इंडिया टुडे-सी व्होटर्स: काँग्रेस+एनसी – ४० ते ४८ जागा, भाजपा – २७ ते ३२, पीडीपी – ६ ते १२, अपक्ष – ६ ते ११

इंडिया टीव्ही-CNX: काँग्रेस+एनसी – ३५ ते ४५ जागा, भाजपा – २४ ते ३४, पीडीपी + अपक्ष – १६ ते २६

न्यूज २४ चाणक्य: काँग्रेस+एनसी – ४६ ते ५० जागा, भाजपा – २३ ते २७, पीडीपी – ७ ते ११, अपक्ष – ४ ते ६

टाईम्स नाऊ: काँग्रेस+एनसी – ३१ ते ३६ जागा, भाजपा – २८ ते ३०, पीडीपी – ५ ते ७, अपक्ष – ८ ते १६

रिपब्लिकन टीव्ही-पी मार्क: काँग्रेस+एनसी – ३१ ते ३६ जागा, भाजपा – २८ ते ३०, पीडीपी – ५ ते ७, अपक्ष – ८ ते १६

Haryana Exit Polls Results 2024 : हरियाणात भाजपाची हॅटट्रिक चुकणार; १० वर्षांनी काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता

हरियाणा

न्यूज २४ चाणक्य: भाजपा (एनडीए) – १८ ते २४, काँग्रेस (इंडिया) – ५५ ते ६२, इतर – २ ते ५

रिपब्लिकन टीव्ही-पी मार्क: भाजपा (एनडीए) – १८ ते २४, काँग्रेस (इंडिया) – ५५ ते ६२, इतर – २ ते ५

टाइम्स नाऊ: भाजपा (एनडीए) – २२ ते ३२, काँग्रेस (इंडिया) – ५० ते ६४, इतर – २ ते ८

इंडिया टुडे-सी व्होटर्स: भाजपा (एनडीए) – २० ते २८, काँग्रेस (इंडिया) – ५० ते ५८, इतर – १० ते १४

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana exit polls prediction in 2014 2019 jammu kashmir to see hung pmw