कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीअंतर्गत विधानसभेचा सर्वात प्रबळ संघर्ष असलेल्या कागल मतदारसंघात राजकीय वाद थेट माजघरापर्यंत पोहोचला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्या २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा विषय अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरत घाटगे यांची राजकीय कोंडी करतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवर टीकास्त्र डागले आहे. दुसरीकडे घाटगे यांनी पुढील शाहू जयंतीवेळी आमदारकीचा गुलाल लावून येणार, असे आव्हान थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले असल्याने राजकीय खडाखडीला सुरुवात झाली आहे. कागल मतदारसंघातून ५ वेळा निवडून आलेले अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच आणखी एकदा कागल मतदारसंघातून निवडून येणार नंतर खासदार आणि केंद्रात मंत्री होणार असे म्हणत राजकीय दिशा स्पष्ट केली होती. लोकसभा निवडणुकीवेळीही संजय मंडलिक यांच्या प्रचारावेळी वाद झाला तेव्हा त्यांनी सध्या मंडलिकांना निवडून आणू, विधानसभेचे पुढे पाहू, असे विधान करीत घाटगे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. हेही वाचा - राहुल गांधींच्या मणिपूर दौर्यामागचा नेमका उद्देश काय? या दौर्यामुळे भाजपावर दबाव वाढणार का? आता घाटगे यांच्या एका कौटुंबिक प्रसंगावरून मुश्रीफ गटाने त्यांची राजकीय कोंडी चालवली आहे. राजमाता जिजाऊ महिला समिती कागलच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची बतावणी करून संबंधितांनी त्यांना २० लाखांचा गंडा घातला आहे. याच मुद्द्यावरून अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी लहान सहान मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेणारे घाटगे याप्रकरणी गप्पा का आहेत. पत्नीची फसवणूक ते रोखू शकत नाहीत. तर सामान्यांना ते कोणता न्याय देणार. घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असतानाही या प्रकरणाचा तपास का होत नाही, असे म्हणत डिवचले आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत असताना त्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. मला एक प्रकारे संमोहित (हिप्नोटाइज) करण्यात आले होते. यामध्ये समरजित घाटगे यांचे नाव घेण्याचे कारण नाही, अशा शब्दात नवोदिता घाटगे यांनी टीकाकारांना ठणकावले आहे. घाटगे यांनीही या प्रकरणी आपल्या पत्नीची पाठराखण केली आहे. व्यक्तिगत फसवणुकीचे हे प्रकरण राजकीय वादामुळे थेट माजघरात पोहोचले आहे. याद्वारे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवरच कोल्हापुरातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला भाजप - अजितदादा गटातील राज्यपातळीवर मतभेदाची किनार असल्याचेही मानले जात आहे. हेही वाचा - सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात इच्छुकांची संख्या वाढली मुश्रीफ गटाकडून आव्हान दिले जात आहे. घाटगे हेही आक्रमक झाले आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणावर ते महाराजांची जयंती साजरी करत असतात. यावेळी घाटगे यांनी पुढील जयंतीवेळी आमदारकीचा गुलाल लावून येणार. कागल विधानसभेला प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून येणार, असे विधान करून राजकीय प्रतिस्पर्धी मुश्रीफ यांना ललकारले आहे. मुश्रीफ यांनी मतदारसंघात शासकीय विकासकामांच्या माध्यमातून संपर्क आणि त्यामधून प्रचाराचा धडाका लावला आहे. मंडलिक गटाला वगळून कागल विधानसभेचे राजकारण होणार नाही, असे विधान करून संजय मंडलिक यांनी आपले महत्व वाढवून घेतले आहे. रविवारी एका विकास कार्यक्रम प्रसंगी बोलताना हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जोरदार तयारी करून निवडून यावे आणि केंद्रात मंत्री व्हावे, असे म्हणत मंडलिक यांची साखरपेरणी केली आहे. त्यामुळे मंडलिक विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे.