छत्रपती संभाजीनगर : पक्षनेतृत्वाला खूश करण्याची कला, वागण्या-बोलण्यातील भपकेबाजपणा, आपल्या मागे मोठी आर्थिक-राजकीय ताकद असल्याचे सातत्याने दाखवून देणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या परंडा मतदारसंघातच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीत धाराशीव मतदारसंघाचा भाग असलेल्या परंड्यात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांना ८० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे सावंत येथून आपली उमेदवारी कायम ठेवतात की नवा मतदारसंघ शोधतात, याबाबत उत्सुकता आहे.

परंडा हा तसा मागास मतदारसंघ. धाराशिव जिल्ह्याचा तालुका पण व्यवहार सगळे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीबरोबर. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद. डॉ. पद्मासिंह पाटील यांचे भाचे राहुल मोटे यांचा राजकीय प्रभाव असणारा हा भाग. ते सध्या शरद पवार गटात आहेत. त्यांना पराभूत करून तानाजी सावंत यांनी परंडा मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. मात्र, आगामी निवडणुकीत सावंत यांच्यासमोर परंडा टिकवण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा >>>विरोधकांचा अपप्रचार मोडून काढा! पंतप्रधान मोदींची भाजप खासदारांना सूचना

भैरवनाथ शुगर हे सावंत यांच्या राजकारणाचे परंड्यातील केंद्र. सभासद संख्या १० हजारांपेक्षा अधिक. त्यामुळे मतदारसंघातील ६० हजार जणांपर्यंत थेट संपर्क असतो. तीन लाखांपर्यंत मतदार असणाऱ्या मतदारसंघात साखर कारखाना आवश्यक असतो तो मतदारसंघ बांधणीसाठी. तानाजी सावंत यांनी साखर कारखान्यातून ती बांधणी केली आहे. पण अशीच बांधणी राहुल मोटे यांनीही केली आहे. बाणगंगा साखर कारखाना उभारण्यात आणि तो सुरू ठेवण्यात त्यांनी अजित पवार यांचीही मदत घेतली. परिणामी दुष्काळी मागास तालुक्यात पुन्हा साखर कारखांनदारांची लढत होईल असे मानले जात आहे.