एकेकाळी शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख होणारे गुलाबराव पाटील यांच्या तोफेचा मारा ते शिंदे गटात सामील झाल्यापासून उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेतील इतर नेत्यांना सहन करावा लागत आहे. संजय राऊत हे ईडीच्या कचाट्यात सापडल्यापासून गुलाबरावांवर ठाकरे गटाकडून होणारी टिकेची धार काहीशी बोथट झाली असताना धुळे येथील हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात मात्र गुलाबरावांनी केलेल्या आरोपांना आणि टिकेला सडतोड उत्तर सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांच्याकडून मिळाले. मुंबई येथे दसऱ्यानिमित्त आयोजित शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी गर्दी जमविण्याच्या उद्देशाने राज्यात विविध ठिकाणी हिंदू गर्व गर्जना मेळावे घेण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीचे वेध; राज्यातील कोणत्या नेत्याला संधी मिळणार ?

धुळे येथे त्याअंतर्गत घेण्यात आलेला मेळावा गुलाबराव पाटील यांनी उध्दव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आरोप आणि टीकेमुळे चांगलाच गाजला. खानदेशी भाषेतील ठसकेबाज वक्तृत्वासाठी प्रसिध्द असलेल्या गुलाबरावांची जीभ काहीवेळा घसरल्याचेही दिसून आले. उपस्थितांकडून भाषणाला प्रतिसाद मिळू लागला की, भल्याभल्यांचे असे होते. पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावांनी भाषणात रश्मी ठाकरे यांना वगळून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत यांना प्रामुख्याने लक्ष्य केले. भानामती केल्यासारखे उद्धव ठाकरे हे निर्णय घेत होते, असे सांगून त्यांनी कट्टर शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. आपल्याच उमेदवारांना पराभूत करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत तडजोडी केल्याचा आरोप करुन त्यासाठी गुलाबरावांनी धुळे ग्रामीण आणि धुळे शहर या मतदारसंघांचे उदाहरण दिले. शिवसेनेने हिलाल माळी यांना धुळे ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी दिली असती तर ते ५० हजार मतांनी विजयी झाले असते. पण, त्याऐवजी त्यांना ऐनवेळी धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली. आपल्याच लोकांना संपविण्यासाठी त्यांनी सुपारी दिली होती, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा- गाडगेबाबांची दशसूत्री शिंदे-फडणवीस सरकारसाठी अडचणीची का ठरावी ?

गुलाबरावांच्या या आरोपांना मागील विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून पराभूत झालेले सेना-भाजप युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्ममान सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी सडतोड प्रत्युत्तर दिले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आधीच धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, भाजपने धुळे ग्रामीणचाच हट्ट करून शिवसेनेची पारंपरिक जागा मागून घेतली. बदल्यात धुळे शहर विधानसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोडला होता. या वाटाघाटीनंतर भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वाने उध्दव ठाकरे यांना धुळे शहरातील उमेदवार निवडून आणण्याचा विश्वासही दिला होता. परंतु, आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भाजपने राजवर्धन कदमबांडे यांच्या रूपाने पुरस्कृत उमेदवार उभा केला. शिंदे गट ज्यांच्या सोबत जाऊन बसला तो पक्ष असा विश्वासघातकी आहे, अशी पूर्वपीठिका माळी यांनी मांडली. गुलाबरावांच्या मतदारसंघातही भाजपने बंडखोर उमेदवारास बळ दिले होते, तेव्हा गुलाबरावांनी भाजपविरोधात कसा आकांडतांडव केला होता, तेही माळी यांनी दाखवून दिले.

हेही वाचा- नव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट

धुळ्यातून शिंदे गटाच्या आरोपांना इतक्या आक्रमकतेने उत्तर मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. परंतु, ठाकरे गटाचा हा आक्रमकपणा गुलाबरावांच्या दौऱ्यास निषेध करताना फारसा दिसला नाही. पन्नास खोके, एकदम ओके या घोषणेपुरताच तो मर्यादित राहिला. त्यामुळे निषेधाचा केवळ एक सोपस्कार पार पाडला गेला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hilal malis rebuttal to gulabrao patil accusation against aditya thackeray dpj
First published on: 02-10-2022 at 12:08 IST