हिमाचल प्रदेशचे पंचायती राज मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मात्र, कॅबिनेट मंत्र्यांनी बुधवारी (२ जुलै) हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. सोमवारी शिमला येथे पाच मजली निवासी इमारत कोसळली आणि या घटनेची जबाबदारी टाळण्यासाठी एनएचएआयचे अधिकारी त्यांच्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप अनिरुद्ध सिंह यांनी केला आहे. नेमकं हे प्रकरण काय? कॅबिनेट मंत्र्यांवर नक्की काय आरोप करण्यात आला आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

  • शिमला येथील एनएचएआय व्यवस्थापक अचल जिंदाल यांनी सोमवारी घटनास्थळाच्या तपासणीदरम्यान आपल्यावर मंत्र्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला.
  • या हल्ल्यानंतर एनएचएआय अधिकाऱ्याला शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (आयजीएमसी) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
  • जिंदाल यांनी त्यांच्या तक्रारीत मंत्र्यांवर ३० जून रोजी शहरातील माथू कॉलनी भागात मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
  • जिंदाल यांनी दावा केला की, तपासणीसाठी गेले असता वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना देण्यात आले आहेत. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

जिंदाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चमियाना येथील एक बहुमजली इमारत कोसळण्याची घटना घडली. या घटनेचा आढावा घेण्यासाठी शिमला एसडीएमने एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला जिंदाल हे एका साईट इंजिनिअरसह उपस्थित होते. परंतु, एसडीएम तेथे उपस्थित नसल्याने ते भाटाकुफर येथे गेले. भाटाकुफर येथे चार पदरी रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. एनएचएआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना कळले की मंत्रीदेखील काही स्थानिकांसह तेथे उपस्थित होते. आदल्या रात्री सिंह यांनी चमियाना येथील एका बांधकाम स्थळाजवळील इमारत कोसळल्याबद्दल चौकशी केली होती.

जिंदाल पुढे म्हणाले की, कंत्राटदाराने त्यांना इमारत कोसळण्यापूर्वी तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यांनी असेही सांगितले की, ही इमारत एनएचएआयच्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे त्यांनी मंत्र्यांना कळवले होते. या घटनेविषयी चर्चा सुरू असताना एनएचएआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, करारानुसार कोणतेही नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि त्यांनी याबाबत मंत्र्यांना सर्व आवश्यक माहिती दिली आहे. त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी बोलून सर्व दोषींवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.

या घटनेची माहिती अधिकारी देत असताना मंत्र्यांनी अपशब्द वापरले. त्यांना जवळच्या खोलीत नेऊन मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या डोक्यात पाण्याचे मडके फोडण्यात आले, असे आरोप अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीत केले आहेत. या घटनेची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील घेतली असून या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांना देण्यात आले आहेत.

कॅबिनेट मंत्र्यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया काय?

पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे पंचायती राज मंत्री म्हणाले की, त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर निराधार आहे. त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी दावा केला की, तक्रारदार अधिकाऱ्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले नव्हते. त्यांनी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांवर घटनास्थळी स्थानिक लोकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. अनिरुद्ध सिंह म्हणाले, “सुमारे १५० लोक उपस्थित होते. स्थानिकांनी एनएचएआय अधिकाऱ्याविरोधात त्यांनी केलेल्या गैरवर्तनासाठी एफआयआरदेखील नोंदवला आहे.”

त्यांनी पुढे म्हटले, “माझ्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर चुकीचा आहे. त्यात काहीही तथ्य नाही. मी सर्व आरोप फेटाळतो. त्यांना माहीत होते की इमारत कोसळण्याची घटना हा एक मोठा मुद्दा ठरेल आणि म्हणून त्यांनी तो लपवण्यासाठी हे सर्व केले आहे. अधिकारी रुग्णालयात किती काळ होता याची तुम्ही नोंद घ्यावी. तुम्ही तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांचे जबाब घेऊ शकता. आपण चौकशीची वाट पाहावी. चौकशीच्या निकालांना सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत,” असे सिंह यांनी ‘एएनआय’ला सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्र्यांनी पुढे असाही दावा केला की, हिमाचलमधील एनएचएआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यांच्या प्रकल्पामुळे मोठे नुकसान झाले आहे, अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनिरुद्ध सिंह यांनी आरोप केला की कंत्राटदार, एनएचएआय आणि केंद्र सरकार मिळून काम करत आहे. मात्र, एनएचएआयचे अधिकारी कोणाचेही ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “एनएचएआयचे अधिकारी देशातील सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत,” असाही आरोप मंत्र्यांकडून करण्यात आला आहे.