आसाममधील भाजपामध्ये सध्या अंतर्गत वितंडवादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्याविरोधात भाजपाच्या जुन्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या नाराजीमधून भाजपाचे जुने वरिष्ठ नेते अशोक शर्मा यांनी भाजपाला रामराम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले आहे. सध्या आसाम भाजपामध्ये दुफळी माजल्याचे चित्र आहे. अशोक शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते असून त्यांनी २०१६ ते २०२१ या दरम्यान नलबाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी सर्बानंद सोनोवाल हे आसाममधील भाजपाच्या नेतृत्वाखालील पहिल्या सरकारचे नेतृत्व करत होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये, पक्षाने त्यांना तिकीट देण्याऐवजी २०१५ मध्ये पक्षात सामील झालेले काँग्रेस नेते जयंता मल्ला बरुआ यांना नलबाडी मतदारसंघातून तिकीट दिले. सध्या हेमंत शर्मा राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि बरुआ आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत.
हेही वाचा : योजनेवर टीका करणाऱ्या सत्ताधारी आमदारांना तंबी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कानउघाडणी
गेले अनेक महिने आसाम भाजपाच्या नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यानंतर आता अशोक शर्मा यांनी २ ऑगस्ट रोजी पक्षाला रामराम केला असून त्यांनी १० ऑगस्ट रोजी काँग्रेसची वाट धरली आहे. विरोधी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक शर्मा यांनी म्हटले आहे की, त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मोठे वादळ आले आहे. कारण, त्यांचे तीन भाऊ आणि दोन्ही बहिणी या संघाशी निगडीत आहेत. अशोक शर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले की, पक्षामध्ये नव्याने आलेल्या काही लोकांच्या कट-कारस्थानामुळे त्यांना पक्ष सोडायला भाग पाडले गेले. “माझी अडचण अशी होती की ज्या तत्त्वांच्या आधारावर आम्ही भाजपाला आसाममध्ये सत्तेत बसवले होते, ती तत्त्वे आता संपुष्टात आली आहेत. ते काय बोलतात, याकडे फक्त पाहा. ते स्वत:ला ‘पोगोला कुकूर’ (पिसाळलेला कुत्रा) म्हणवून घेतात.” असे त्यांनी म्हटले. अलीकडेच भाजपाच्या कार्यकारी बैठकीमध्ये हेमंत शर्मा यांनी हेच शब्द वापरुन वक्तव्य केले होते. त्यांनी काँग्रेसला इशारा देताना म्हटले होते की, काँग्रेसने पिसाळलेल्या कुत्र्याला चिथावणी देऊ नये.
अशोक शर्मा पुढे म्हणाले की, “लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये काम केले आहे. आपल्याला आमदार म्हणून काम करण्यासाठी वेतन आणि निवृत्तीवेतनही मिळते. मात्र, फक्त स्वत:च्या फायद्यासाठी काम करणारे आमदार किंवा मंत्री आम्ही नाही. पण, आज ज्याप्रकारे सरकारचे नेतृत्व करणाऱ्यांकडून संपत्ती गोळा केली जात आहे, त्या मानसिकतेला मी पाठिंबा देऊ शकत नाही.” काँग्रेसमध्ये प्रवेश करताना, अशोक शर्मा यांनी पक्ष सोडण्यामागे भाजपा नेतृत्वाची धर्मांधताही कारणीभूत असल्याचे म्हटले. सध्या पक्षाचे राज्यातील चारित्र्य जातीयवादी झाले असल्याचेही विधान त्यांनी केले. “गेल्या तीन वर्षापासून, सातत्याने हिंदू आणि मुस्लिमांबद्दल बोलून हेमंत बिस्वा शर्मा समाजामध्ये दुही पेरत आहेत. स्वत:ला हिंदूंचे तारणहार म्हणवणाऱ्यांचे राज्य मोडून काढण्याचा संकल्प घेऊन मी या पक्षात (काँग्रेस) प्रवेश केला आहे. मी हिंदुत्वासाठी गेली अनेक वर्षे काम केले आहे पण मी कुणाच्याही विरोधात कधी गेलेलो नाही. मी भाजपाच्या नेतृत्वात सर्व स्तरातील सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याचे काम केले; मी फक्त ‘हिंदू, हिंदू, हिंदू’ म्हणत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न कधीही केला नाही.”
यापूर्वी अशोक शर्मा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा अनादर हे आपल्या असंतोषाचे कारण असल्याचे सांगितले होते. भाजपाचे दररंग-उदलगुरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार दिलीप सैकिया यांनी अशोक शर्मा यांच्यावर या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप केला तेव्हा हे प्रकरण अधिकच तापले. सत्ताधारी भाजपामध्ये इतरही अनेक कारणास्तव सतत धुसफूस सुरु होती. २०१५ मध्ये, खुद्द हेमंत बिस्वा शर्मा हे देखील काँग्रेसमधून भाजपामध्ये सामील झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर आलेल्या हेमंत शर्मा यांच्याकडेच भाजपाचे नेतृत्व गेले. मात्र, अशोक शर्मा यांच्या सारख्या संघाशी निगडीत जुन्या-जाणत्या नेत्याच्या पक्ष सोडून जाण्यामुळे पक्षाअंतर्गत असलेली दुफळी थेट चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा : अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
मात्र, दुसऱ्या बाजूला हेमंत शर्मा यांनी भाजपामध्ये ‘जुने विरुद्ध नवे’ असा काहीही वाद नसल्याचे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी यावर प्रकाश टाकला. त्यांनी असा दावा केला की, “हिंदू धर्मीयांना काँग्रेसमध्ये सामील होताना पाहून मला आनंद झाला आहे. जर आरएसएसची चळवळ राजीव भवनापर्यंत पोहोचत असेल, तर तसेच घडावे अशी माझी इच्छा आहे. आपले संघाचे कार्यकर्ते जर उद्या तिथे जाऊन सिंहासारखी गर्जना करणार असतील तर माझ्यापेक्षा आनंदी कोणीही असू शकत नाही. आरएसएसची विचारसरणी फक्त भाजपाच्या उभारणीसाठी नसून संपूर्ण समाज आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी आहे.” हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्वत:चं काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता, त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “देशाच्या हितासाठी काम करण्यासाठी पूरक वातावरण काँग्रेसमध्ये मिळाले असते तर आम्ही तो पक्ष कधीच सोडला नसता. जर आज त्यांनी राजीव भवनामध्ये आसाममधील हिंदू आणि आदिवासींसाठी काम करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण केले तर ते आमच्यासाठी आदर्श ठरतील.”