Himanta Biswa Sarma on Guwahati Flood : मुसळधार पावसामुळे आसामची राजधानी गुवाहाटीला पुराचा तडाखा बसला आहे. पुरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे आसाम सरकारवर टीकेचा भडीमार चालू आहे. मात्र, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी या पुराचं खापर गुवाहाटी शहराबाहेर असलेल्या एका खासगी विद्यापीठावर फोडलं आहे. तसेच ते म्हणाले, "हे विद्यापीठ एका बंगाली मुस्लिम व्यक्तीचं असून त्याने पूर जिहाद सुरू केला आहे." गुवाहाटीमधील पूर, सरकारी यंत्रणेचं अपयश, ठिकाठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांचं झालेलं नुकसान याबाबत एका व्यक्तीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांना खडे बोल सुनावले होते. गुवाहाटी शहरातील नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असल्यामुळे उच्च न्यायालयाने या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेतली. न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली. यावेळी बिष्णोई म्हणाले, "गुवाहाटी शहरात पाणी तुंबणे, पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. नागरिकांना सातत्याने या गंभीर समस्येचा सामना करावा लागतोय. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आसाम सरकरने तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे." मेघालयमधून येणाऱ्या पाण्यावर आमचा इलाज नाही : आसाम सरकार या पुरानंतर आसामचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री म्हणाले होते की "गुवाहाटीत ज्या पाण्यामुळे पूर आला त्यातील निम्म्याहून अधिक पाणी मेघालयमधून आलं होतं. दीड तासांत १३६ मिमी पावसाची नोंद झाली होती. हा पाऊस इतका होता की गुवाहाटीमधील पर्जन्य व्यवस्थापन प्रणाली कोलमडली. पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. आम्ही आपल्या शहरातील पाण्याचं व्यवस्थापन करू शकतो, मात्र मेघालयातून येणाऱ्या पाण्यावर आमचा इलाज नाही." हे ही वाचा >> मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी मुख्यमंत्र्यांनी मेघालयमधील विद्यापीठावर खापर फोडलं दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी वादग्रस्त वक्तव्य करून सर्वांचं लक्ष वेधलं. त्यांनी या पुरासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ मेघालयला (यूएसटीएम) जबाबदार धरलं. हे विद्यापीठ आसामच्या शेजारील राज्य मेघालयच्या री-भोई जिल्ह्यात आहे. २००८ मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. एड्युकेशन रिसर्ज अँड डेव्हलपमेंड फाउंडेशनद्वारे हे विद्यापीठ चालवलं जातं. बहुबुबूल हक यांनी या संस्थेची स्थापना केली होती. तसेच ते या विद्यापीठाचे कुलगुरू देखील आहेत. ते आसामच्या करीमगंज जिल्ह्यामधील बराक घाटी येथे राहणारे बंगाली मुस्लिम आहेत. त्यांनी सुरू केलेल्या विद्यापीठात तब्बल ६,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये आसाममधील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सरमा यांचा आरोप काय? मुख्यमंत्री सरमा म्हणाले, डोंगराळ भागात केली जाणारी वृक्षतोड या पुरामागचं प्रमुख कारण आहे. यूएसटीएम विद्यापीठाच्या मालकांनी आसामविरोधात 'पूर जिहाद' सुरू केला आहे. आपण भूमी जिहादबद्दल (लँड जिहाद) बोलतो. मात्र हक यांनी आसामविरोधात पूर जिहाद छेडला आहे. त्यामुळेच त्यांनी क्रूरपणे डोंगराळ भागातील झाडं तोडली. आपल्याला या कृतीला जिहादच म्हणावं लागेल. कारण ते जाणूनबुजून केलेलं कृत्य आहे, असं मला वाटतं. अन्यथा ते वृक्षतोड न करता, डोंगर न पोखरता इमारत बांधू शकले असते, ड्रेनेजची व्यवस्था करू शकले असते. मात्र त्यांनी कोणतीही माहिती न घेता, भविष्यातील धोक्यांचा विचार न करता बुलडोझरचा वापर करून झाडं भुईसपाट केली, डोंगर पोखरले." हे ही वाचा >> शिवसेना शिंदे गटाचे नालासोपार्यात शक्तिप्रदर्शन, उत्तर भारतीयांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघावर दावा खत जिहाद व भूमी जिहादचाही आरोप मुख्यमंत्री सरमा यांनी यापूर्वी बंगाली मुस्लिम शेतकऱ्यांवर खत जिहादचा आरोप केला होता. सरमा म्हणाले होते, "मुस्लिम शेतकरी अधिकाधिक अन्नधान्य, भाज्या पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करत आहेत. ते अन्न खाऊन लोक आजारी पडत आहेत." सरमा यांनी यापूर्वी मुस्लिमांवर लँड जिहादचाही (भूमी जिहाद) आरोप केला होता. तसेच त्यांनी म्हटलं होतं की "राज्यातील जमीन विक्री थांबवली पाहिजे". त्यानी लव्ह जिहादवरही अनेकदा भाष्य केलं आहे. "आमचं सरकार असा कायदा आणेल की जे लोक लव्ह जिहादमध्ये सहभागी असतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल", असं ते म्हणाले होते.