Hint of strain in Bihar Mahagathbandan over bureaucratic wrangle tejaswi yadav nitish kumar ssa 97 | Loksatta

मर्जीतील अधिकारी न मिळाल्याने ‘महागठबंधन’मध्ये रंगलं ‘राजकारण’; २०१७ ची पुनरावृत्ती होणार?

राजदच्या मंत्र्यांना मर्जीतील सचिव न मिळाल्याने नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मर्जीतील अधिकारी न मिळाल्याने ‘महागठबंधन’मध्ये रंगलं ‘राजकारण’; २०१७ ची पुनरावृत्ती होणार?
तेजस्वी यादव नितीश कुमार ( संग्रहित छायाचित्र )

नितीश कुमार यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपा जनता दल युनायटेड ( जेडीयू ) फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप करत नितीश कुमारांनी युती तोडली. त्यानंतर नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दलाबरोबर ( राजद ) सत्ता स्थापन केली. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर आता महागठबंधनमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसत आहे.

राजदच्या सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितल्यानुसार, राजदच्या मंत्र्यांना त्यांच्या मर्जीनुसार सचिव आणि अन्य प्रशासकीय अधिकारी मिळाले नाहीत. यापूर्वीही, २०१७ साली नितीश कुमारांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजदची साथ सोडण्याच्या निर्णय घेतला होता. त्यानंतर जेडीयूने पुन्हा एकदा भाजपासमवेत सत्ता स्थापन केली होती. त्यात आता पुन्हा मर्जीतील अधिकारी न मिळाल्याने राजदतील अनेक मंत्री नाराज असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : ऋतुजा लटके यांचा प्रचारासोबतच मतदानविषयक जनजागृतीवर भर

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या वादावरून राज्याचे राजदचे आमदार सुधाकर सिंह यांनी कृषी मंत्री पदावर पाणी सोडलं होतं. त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला बोलताना म्हटलं, “अनेकवेळा स्मरणपत्रे देऊन देखील माझ्या विभागातील सचिवांनी मला माहिती पुरवली नाही. परंतु, मुख्यमंत्री माझ्या खात्यातील सचिवांचे गुणगाण गात होते. त्यामुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.”

“नवीन सरकार स्थापन झाल्यावर मर्जीतील अधिकारी निवडण्याचा अधिकार मंत्र्यांना असतो. मात्र, जेडीयू आणि राजद सरकारमधील अनेक मंत्र्यांचे सचिव थेट मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करत आहेत. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरूनही सरकारमध्ये मतभेद आहेत,” असे राजदच्या एका नेत्याने सांगितलं.

हेही वाचा : ‘ट्रॅफिकचे नियम तोडले तरी दंड नाही,’ गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा, पण अपघातांची आकडेवारी मात्र चिंता वाढवणारी!

याप्रकरणावर तेजस्वी यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तरीही, राजदमधील अनेक नेते यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “राजद हा महागठबंधनचा एक मोठा साथीदार आहे. नितीश कुमार यांनी राजदला गृहीत धरून चालू नये. पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. तेजस्वी यादव यांनी २०२० साली विधानसभेत स्वबळावर ८० आमदार निवडून आणले आहेत. तेजस्वी यादव यांचे राजकीय वजन वाढवण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचं,” एका राजदच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2022 at 19:17 IST
Next Story
‘ट्रॅफिकचे नियम तोडले तरी दंड नाही,’ गुजरातच्या गृहराज्यमंत्र्यांची घोषणा, पण अपघातांची आकडेवारी मात्र चिंता वाढवणारी!