सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : तुळजापूर- उस्मानाबाद मार्गासाठी ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा मंजूर झालेला निधी, वैद्यकीय महाविद्यालय या दोन विकासात्मक घडामोडीमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची राजकीय पटलावर सरशी झाल्याचे चित्र असतानाच पीक विमा तक्रार समितीत लोकप्रतिनिधी कसे नाहीत, या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून ओम राजेनिंबाळकर हे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना राणा जगजितसिंह यांनी ओम राजेनिंबाळकर यांना ‘या बैठकीस लोकप्रतिनिधी नसतात रे बाळा,’ असा उल्लेख केला. बाळा या शब्दास आक्रमकपणे आक्षेप घेत, ‘औकातीत रहा, मला तुझे संस्कार माहिती आहेत,’ असे सुनावले. एकेरीवर झालेल्या या उल्लेखामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय वादाची भाषा एकेरीच राहील, असे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि दोन्ही घराण्यातील संघर्षाचा इतिहास पुन्हा एकदा समोर आला.

आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवन राजेनिंबाळकर हे खरे तर नातेवाईक. त्या दोघांमध्ये शेवटच्या काळात कमालीचा राजकीय संघर्ष झाला होता. त्यातून २००४ मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत पवन राजे निंबाळकर यांनी डॉक्टर पद्मश्री पाटील यांच्यासमोर उमेदवारी दाखल करत आव्हान निर्माण केले. केवळ ४८४ मतांनी डॉ. पद्मसिंह पाटील कसेबसे विजयी झाली होते. पण त्यानंतर पवन राजेनिंबाळकर यांची हत्या झाली होती. या हत्येचा कट डॉ. पद्मसिंह पाटील यांनी रचला असा आरोप ठेवून त्यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली होती. तेव्हापासून अगदी प्रत्येक राजकीय घटनेमागे पुढील पिढीमध्येही संघर्ष वाढतच गेला. ओम राजेनिंबाळकर यांनी आधी २००९ मध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून राणा जगजीत सिंग यांचा पराभव केला.

हेही वाचा: कोल्हापूर दौऱ्यात राजकीय परीघ रुंदावण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न

नंतर २०१९ मध्ये लाेकसभा निवडणुकीमध्ये राणा जगजितसिंह यांचा पराभव ओमराजे यांनी केला. राजकीय पातळीवरील या घटना घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ज्याच्या बाजूची सत्ता त्याचा प्रशासनावर वरचष्मा, असे दिसून येत असे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री शंकरराव गडाख असताना आमदार तानाजी सावंत, कैलास पाटील व खासदार ओम राजेनिंबाळकर यांचा वरचष्मा असे. या काळात राणा जगजितसिंह पाटील बैठकांमध्ये फारसे बोलत नसत, असे या समितीमधील सदस्य सांगतात. आता सत्तेत बदल झाला आणि राणा जगजीत सिंह यांचा भाजप सत्तेत आला. पालकमंत्री तानाजी सावंत यांची भूमिका राणा जगजितसिंह पाटील यांच्या बाजूने झुकलेली असल्याने आता शाब्दिक चकमकीची जागा एकेरीवर उतरली असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात राज्यपालांविरोधात आंदोलनात राष्ट्रवादी आस्ते कदम

राणा जगजितसिंह पाटील यांनी आता मतदारसंघ बदलून तुळजापूरमधून यश मिळविले. सत्तेत भाजपचा वरचष्मा आहे. गेल्या काही वर्षांत पीक विमा प्रश्न असो किंवा वैद्यकीय महाविद्यालय दुसऱ्या पिढीमध्ये श्रेयवादाची लढाई नव्या वळणावर येऊन ठेपली असल्याचे चित्र दिसून येत आहे. आक्रमक ओम राजेनिंबाळकर यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही एका दौऱ्यात आपल्या गाडीमध्ये बसवून घेतले होते. उस्मानाबादच्या राजकारणाचा आक्रमक चेहरा कोणत्याही निवडणुकीत अधिक विचित्र होत जातो. त्याचाच एक भाग म्हणून या घटनांकडे पाहिले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of second generation political struggle between om rajenimbalkar rana jagjit singh patil tuljapur osmanabad road solapur print politics news tmb 01
First published on: 04-12-2022 at 13:55 IST