scorecardresearch

इतक्या कमी काळात संघ-भाजपने देश ताब्यात कसा घेतला?,राहुल गांधी यांचा नागरी संघटनांच्या बैठकीत सवाल

काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो’ यात्रा काढली जाणार असून त्यामध्ये नागरी संघटनांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

इतक्या कमी काळात संघ-भाजपने देश ताब्यात कसा घेतला?,राहुल गांधी यांचा नागरी संघटनांच्या बैठकीत सवाल

महेश सरलष्कर

इतक्या कमी काळात संघ-भाजपने देश ताब्यात कसा घेतला? इतक्या सहजपणे राज्य यंत्रणेवर संघ-भाजपने कब्जा कसा केला? त्यांनी लोकांची मने कशी बदलली?, असे प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेसने आयोजित केलेल्या नागरी संघटनांच्या बैठकीत उपस्थित केले. काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो’ यात्रा काढली जाणार असून त्यामध्ये नागरी संघटनांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला १५० संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘देशात काँग्रेस पक्ष हा एकटाच परिवर्तन घडवून आणू शकणार नाही. जनतेची शक्ती उभी करावी लागेल. इथे उपस्थित केलेले प्रश्न घेऊन मला देशातील लोकांशी थेट संवाद साधायचा आहे’, असे राहुल बैठकीत म्हणाल्याचे समजते. ‘भारत जोडो’ यात्रा २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी नाही तर, पुढील १५-२० वर्षे सतत आपल्याला संघ व भाजपच्या विचारांविरोधात संघर्ष करावा लागेल व त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. त्यासाठीची ही यात्रा सुरुवात असेल. आपल्यासाठी ही राजकीय यात्रा नव्हे तर, आध्यात्मिक यात्रा असल्याचेही राहुल यांनी सांगितले.

बिनशर्त पाठिंबा देऊ नका!

काँग्रेसच्या उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन बैठकीत ‘भारत जोडो’ यात्रेची सोनिया गांधी यांनी घोषणा केली होती. ही यात्रा २ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार होती पण, ती आता ७ सप्टेंबर रोजी सुरू होईल. याच काळात काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदासाठीही निवडणूक होणार आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची अजूनही तयारी दाखवलेली नाही. मात्र, ते ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहेत. ‘काँग्रेसला तुमचा विनाशर्त पाठिंबा नको. काँग्रेसवर तुम्ही नाराज आहात, काँग्रेसबद्दल शंकाही आहेत, हे मला माहीत आहे. तुमच्या मनातील प्रश्नही मला सांगा, जी टीका करायची असेल ती करा. मी सर्व ऐकून घ्यायला तयार आहे. तुमच्या भूमिका मांडल्यानंतर या देशातील राजकारण कसे बदलायचे हे समजू शकेल. तुमचे मार्गदर्शन मला पाहिजे’, असे मनमोकळेपणाने राहुल गांधी यांनी नागरी संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितल्याचे समजते.

काँग्रेसने चुका मान्य कराव्यात!

काँग्रेसच्या आवाहनाला नागरी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ‘भारत जोडो यात्रे’ला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, काँग्रेसने पूर्वी केलेल्या चुकांची कबुली दिली पाहिजे, असेही प्रतिनिधींनी स्पष्ट केले. काही प्रतिनिधींनी काँग्रेसच्या भूमिकांसंदर्भात शंका उपस्थित केली. देशात भयानक आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. सामाजिक तणावही वाढू लागलेला आहे. यासंदर्भात काँग्रेसची नेमकी भूमिका काय? आदिवासी, दलित आणि ओबीसींच्या प्रश्नावर काँग्रेसने ठोस भूमिका घेतलेली नाही. मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण आहे पण, काँग्रेसने धोरण स्पष्ट केलेले नाही. काँग्रेकडून पूर्वी झालेल्या चुका त्यांनी कबूल केल्या पाहिजेत, असे सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांनी राहुल गांधी यांना ठणकावून सांगितल्याचे समजते.

सर्व पक्षांनाही आवाहन

काँग्रेसच्या पुढाकाराखाली भारत जोडो यात्रा काढली जात असली तरी, तिथे काँग्रेसचा झेंडा नसेल. राष्ट्रीय तिरंगा घेऊन यात्रा निघेल. ही यात्रा सर्वपक्षीय असेल, त्यामुळे अन्य पक्षांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सादरीकरणही केले व यात्रेचा उद्देशही स्पष्ट केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How bjp and rss capture country in short period print politics news pkd

ताज्या बातम्या