भाजपाने पश्चिम बंगालमधील आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांसोबत आघाडी करण्याची शक्यता सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. काही दिवसांपूर्वी या बंडखोर खासदारांनी आपला गट ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षात विलीन केला होता. तेव्हापासून आपण भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा भाग असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. चार महिन्यांपूर्वी बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले होते. त्यानंतर पक्षाने आता आगामी महापालिकांच्या निवडणुकीत स्वबळाची तयारी केल्यामुळे या निर्णयाला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

पश्चिम बंगालमधील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोलकाता आणि हावडा महापालिकेची निवडणूक दुर्गापूजेच्या उत्सवानंतर होण्याची शक्यता आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन्ही महापालिकांच्या निवडणूक नकाशात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. राज्यात भाजपाची कोणाशीही युती नसून कोलकाता आणि हावडा महापालिकेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आणि जिंकणार, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी व्यक्त केला. केंद्रात ‘एनसीपीआय’ या पक्षाने भलेही आम्हाला पाठिंबा दिला असेल, पण दिल्ली आणि कोलकाता यांच्यात सुमारे १,५०० किलोमीटरचे अंतर आहे, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले. यादरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर कोलकात्यात भाजपाचा वाढलेला आत्मविश्वासही या निर्णयामागे असल्याचे मानले जात आहे.

“भ्रष्टाचार मुळापासून उखडून फेकणार”

“पूर्वी कोलकाता महापालिकेत (KMC) भाजपाची जवळपास कोणतीही ताकद नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोलकात्यातील बहुतांश मतदारसंघांमध्ये लोकांनी भाजपाला मतदान केले. आम्ही सर्व २०९ जागांवर निवडणूक लढवू आणि मोठ्या बहुमताने विजय मिळवू,” असे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असलेल्या भाजपा समितीचे संयोजक रितेश तिवारी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. भाजपाच्या प्रचारात भ्रष्टाचार आणि महापालिकेच्या नागरी सुविधांचे प्रश्न केंद्रस्थानी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी महापालिकेत बिल्डर, भूमाफिया, महापालिका अधिकारी आणि पोलिसांचे साटेलोटे होते. केएमसीमध्ये इतका भ्रष्टाचार होता की, लोक महापालिकेला ‘कॉर्पोरेशन ऐवजी ‘चोरपोरेशन’ म्हणतात. आम्ही भ्रष्टाचार मुळापासून उखडून फेकू आणि जनतेची सेवा करू, असा दावाही त्यांनी केला.

एनसीपीआय अजूनही युतीबाबत आशावादी

दुसऱ्या बाजूला आपण भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असल्याचा दावा करणाऱ्या ‘एनसीपीआय’ अजूनही युतीबाबत आशावादी असल्याचे दिसते. याबाबत पक्षाच्या खासदार काकोली घोष दस्तिदार म्हणाल्या की, आमचा पक्ष हा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील सर्वात मोठा घटकपक्ष आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकाही युती म्हणूनच लढवण्याचा आमचा विचार आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल आणि युतीची दाट शक्यता आहे. दुसरीकडे- भाजपाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी मात्र ‘एनसीपीआय’ सोबत युती करण्याला विरोध केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर आम्हाला ठाम विश्वास असून राष्ट्रीय राजकारण आणि राज्यातील स्थानिक रणनीती यामध्ये फरक असतो. एससीपीआयमधील नेते हे पूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही त्यांच्याविरोधात अनेक वर्षे लढा दिला आहे. त्यामुळे या पक्षाबरोबर युती केल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या नेत्यांशी आम्ही हातमिळवणी केल्यास मतदार आमच्यावर कसा विश्वास ठेवतील? असा प्रश्न भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने उपस्थित केला.

राजकीय समीकरणे आणि प्रभाग फेररचना

भाजपा नेत्यांच्या मते, तृणमूल काँग्रेस, एनसीपीआय, डावे आणि काँग्रेस यांच्यातील बहुकोणीय लढतीचा थेट आमच्या पक्षाला फायदा होईल. याशिवाय प्रभाग फेररचनेमुळे कोलकाता पालिकेतील वॉर्डांची संख्या १४४ वरून २०९ आणि हावडामध्ये ५० वरून ६८ होणार आहे. बदललेली सामाजिक आणि राजकीय समीकरणे पक्षाच्या पथ्यावर पडतील, असे त्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकांसाठी भाजपाने जबाबदाऱ्याही निश्चित केल्या असून केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार यांच्याकडे कोलकाता निवडणुकीची, तर राज्यसभा खासदार राहुल सिन्हा यांच्याकडे हावडा निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली आहे. भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या प्रचारात रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, पथदिवे आणि शहरी पायाभूत सुविधांचे प्रश्न प्रामुख्याने केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या निवडणुकांच्या माध्यमातून प्रभाग आणि बूथ पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद किती आहे, याचाही आढावा घेतला जाणार आहे. प्रभागांची संख्या वाढल्याने सध्या कार्यरत असलेल्या अनेक नगरसेवकांच्या निवडणुकीच्या समीकरणांवरही परिणाम होणार आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने नव्या राजकीय चेहऱ्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी निर्माण होणार आहे.

टीएमसीकडून प्रभाग पुनर्रचनेवर प्रश्नचिन्ह

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने (TMC) महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्याचवेळी पक्षाने प्रभाग पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि आम्हाला चांगले निकाल मिळतील. मात्र, प्रभाग पुनर्रचनेच्या प्रक्रियेबाबत आमचे गंभीर आक्षेप आहेत. ही प्रक्रिया लोकसंख्येच्या आधारावर व्हायला हवी होती; पण भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी ती मतदारसंख्येच्या आधारावर केली जात आहे,” असा आरोप टीएमसीचे नेते कुणाल घोष यांनी केला आहे. यादरम्यान हावडा महापालिका निवडणूक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. कारण या महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून निवडून आलेले महापालिका मंडळ अस्तित्वात नाही. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित प्रशासनांना सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रभाग पुनर्रचनेचे अंतिम प्रस्ताव पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच प्रभाग आरक्षणासंदर्भातील मसुदा आदेश सप्टेंबरच्या मध्यापर्यंत अपेक्षित आहेत. कोलकाता आणि हावड्यासह सर्व महापालिका निवडणुका ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. या महापालिका निवडणुकांपूर्वी ६ ऑक्टोबर रोजी नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकांची मतमोजणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.