दिल्लीतील तीव्र आंदोलनांमुळे भाजपा आणि केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेविरोधात आवाज उठवला जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भाजपाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे पक्षातील सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांचा समावेश करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पावलं उचलली जात आहेत. त्याचवेळी जंतरमंतरवर आता आंदोलन करण्यास बंदी असणार आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरची आंदोलनाचे अधिकृत ठिकाण म्हणून असलेली मान्यता रद्द केलीय; तर आता रामलीला मैदानासह आणखी दोन मोठी ठिकाणं आंदोलनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. यासोबतच आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधण्याची तयारीही भाजपाने दाखवली आहे.

भाजपाने या प्रकरणात विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांची एक स्वतंत्र माहितीपत्रिका तयार करण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांपासून ते देशातील मतदार याद्यांमध्ये झालेल्या बदलांच्या आकडेवारीपर्यंत विविध मुद्द्यांचा यात समावेश आहे. या माहितीच्या आधारे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याची पक्षाची रणनीती आहे.

भाजपाचा पलटवार

दिल्लीतील आंदोलनांवरून भाजपानेही विरोधकांवर पलटवार केला आहे. राजधानीत अराजकता निर्माण होत असल्याचा आरोप करत भाजपाने काँग्रेस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं आहे. एसआयआर प्रक्रियेमुळे अनेक मतदारांचा हक्क हिरावला जात असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले असताना, भाजपा या आंदोलनांचं राजकीय चित्र वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
एसआयआर प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपाने घुसखोरांचा मुद्दा आणि लोकसंख्येतील बदलांचा विषयही पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली पूर्वीपासूनची भूमिका कायम ठेवल्याचे दिसून येते.

निवडणूक आयोगाची भूमिका

दी इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारित्रेतून निवडणूक आयोगातच मतभेद असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया पूर्ण झालेले २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दी इंडियन एक्स्प्रेसने २३ सप्टेंबरला दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा एसआयआरसंदर्भातील निर्णय आणि प्रक्रियेतील त्रुटींवर आक्षेप नोंदवले होते. आपल्याला विश्वासात न घेता आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काही निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले होते.

यानंतर ज्या राज्यांमध्ये एसआयआरवरील हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, तिथे मतदार यादीत पुन्हा समाविष्ट केलेल्या मतदारांची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जात आहे.

दिल्लीमध्येही लाखो मतदारांची नावं वगळण्यात आली. आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, २०२६ मधील एसआयआरनंतर तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीत दिल्लीतील सुमारे १.४५ कोटी मतदारांपैकी ४७.७ लाख मतदारांची नावं वगळण्यात आली होती. दिल्लीच्या मतदार यादीतील सुमारे ३३ लाख नोंदींमध्ये तार्किक विसंगती आढळली होती किंवा संबंधित मतदारांचे तपशील जुन्या यादीशी जोडले जात नव्हते. या त्रुटी दूर करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे २० लाख प्रकरणं निकाली काढल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मतदारांच्या काही तक्रारींची नोंद करून घेण्यासाठी १४,९४७ बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ), ९०२ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ), ७० मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), १३ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची (डीईओ) नेमणूक करण्यात आली आहे. तक्रारी असल्यास या अधिकाऱ्यांशी किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहनही करण्यात आलं. एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, असं आश्वासन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे.

आंदोलनांमुळे राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सार्वजनिक वाहतूक ठप्प आहे आणि आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचे दृश्य आपण पाहत आहोत. या सर्व घडामोडींनंतर सोमवारी दिल्ली पोलिसांनी आंदोलनांच्या ठिकाणांबाबत मोठा निर्णय घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार, दिल्लीचे पोलिस आयुक्त अनुराग कुमार यांनी आदेश जारी करून जंतरमंतरला अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून वगळलं.

यापुढे आंदोलनांसाठी मध्य दिल्लीतील रामलीला मैदान, उत्तर दिल्लीतील बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदान ही तीन ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. नागरिकांना होणारा त्रास आणि गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले.

तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ जून-जुलैमध्ये ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) जंतरमंतरवर जोरदार आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. शिक्षणातील गैरप्रकारांमुळे तरुणांमध्ये असंतोष असतानाच, केंद्र सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचा मार्ग स्वीकारला होता. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्याशी चर्चेच्या अनेक फेऱ्या घेतल्या. या चर्चेनंतर तोडगा निघाला आणि आंदोलन संपलं.

या आंदोलनानंतर केंद्र सरकारने परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी संसदेत कठोर कायदा मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) कामकाजातही बदल करण्यात आले. परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना देखील करण्यात आली.

दिल्लीतील आंदोलनांबाबत भाजपाच्या सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, कायदा सर्वांसाठी सारखाच आहे आणि सरकार त्यानुसारच काम करत आहे. रस्त्यावर आंदोलन करण्यापासून ते मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या मागणीपर्यंत प्रत्येक गोष्ट ठरलेल्या प्रक्रियेनुसारच व्हायला हवी. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी कायद्यानुसार महाभियोगाची प्रक्रिया करणं आवश्यक असल्याचंही पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, एसआयआरच्या मुद्द्यावरचा संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावलं उचलली आहेत. त्याचवेळी नवी दिल्लीसारख्या संवेदनशील भागात आंदोलन करणाऱ्या तरुणांना हटवताना सरकारने संयमाची भूमिका घेतली आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणं किंवा दंडात्मक कारवाई करणं टाळलं आहे, असा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडतानाच नागरिकांच्या आंदोलन करण्याच्या अधिकाराचाही विचार करण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.