Iran Supreme leader died: अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (CIA) कडून मिळालेल्या महत्त्वाच्या गुप्त माहितीनुसार अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) ते वरिष्ठ इराणी राजकीय व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची खात्रीशीर माहिती सीआयएकडे होती, असे वृत्त आहे.

‘द न्यूयॉर्क टाईम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सीआयए’ने या संयुक्त अमेरिका-इस्रायली हल्ल्यांच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या अनेक महिन्यांपासून एजन्सी खामेनी यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होती आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजाच्या पद्धतींचे सविस्तर विश्लेषण करत होती.

अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर, इराणी राज्य माध्यमांनी रविवारी पुष्टी केली की राजधानी तेहरानवर झालेल्या हल्ल्यात खामेनी ठार झाले.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर हल्ला

टाईम्सच्या अहवालानुसार, हल्ल्याच्या काही वेळ आधी सीआयएला माहिती मिळाली होती की शनिवारी सकाळी मध्य तेहरानमधील एका नेतृत्व संकुलात उच्चस्तरीय बैठक होणार आहे आणि त्या बैठकीला स्वतः सर्वोच्च नेते उपस्थित राहणार आहेत. या अचूक गुप्त माहितेमुळे संयुक्त हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी सुलभ झाली, असे सांगितले जाते.

ऐनवेळी हल्ल्याच्या वेळेत बदल

सुरुवातीला ही कारवाई अंधाराच्या आड पार पाडण्याची योजना अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी आखली होती. मात्र, खामेनी यांच्या नेमक्या ठिकाणाबाबत मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हल्ल्याच्या वेळेत काही प्रमाणात बदल करण्यात आल्याचे सांगितले जाते.

ही संवेदनशील माहिती सीआयएमार्फत इस्रायलला देण्यात आली. इस्रायलने याआधीपासूनच अनेक महिन्यांपासून तयारी केलेल्या व्यापक ऑपरेशनमध्ये तिचा समावेश केला होता. या संपूर्ण नियोजनाशी परिचित सूत्रांनी टाईम्सला सांगितले की, इराणच्या सर्वोच्च नेतृत्वातील प्रमुख व्यक्तींना लक्ष्य करून राज्ययंत्रणेला जलद आणि निर्णायक धक्का देणे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश होता.

अहवालानुसार, इस्रायलमध्ये सकाळी ६:०० वाजता (०४०० GMT) ही कारवाई सुरू झाली, जेव्हा लढाऊ विमानांनी त्यांच्या तळांवरून उड्डाण केले. सुमारे दोन तास पाच मिनिटांनंतर, तेहरानमध्ये सकाळी ९:४० वाजता लांब पल्ल्याच्या अचूक-मार्गदर्शित शस्त्रास्त्रांनी संबंधित कंपाऊंडवर हल्ला चढवला. त्या वेळी वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी एका इमारतीत बैठक घेत होते, तर खामेनी जवळच्याच दुसऱ्या इमारतीत उपस्थित होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रणनीतिक आश्चर्य

“सकाळी तेहरानमधील अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ले करण्यात आले. त्यापैकी एका ठिकाणी इराणच्या राजकीय आणि सुरक्षा क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी एकत्र जमले होते,” असे एका इस्रायली संरक्षण अधिकाऱ्याने टाईम्सने पाहिलेल्या संदेशात नमूद केले आहे. युद्धासाठी इराण सज्ज असतानाही इस्रायलने “रणनीतिक आश्चर्य” साध्य केल्याचा दावा त्या अधिकाऱ्याने केला.

सर्वोच्च सुरक्षा सल्लागारही ठार

इराणच्या न्यायव्यवस्थेने पुष्टी केली की खामेनी यांच्यासह दोन वरिष्ठ लष्करी अधिकारीही या कारवाईत मारले गेले. त्यामध्ये क्रांतिकारी रक्षक दलाचे प्रमुख मोहम्मद पौकोर आणि सर्वोच्च सुरक्षा सल्लागार अली शामखानी यांचा समावेश आहे. इराणच्या राज्य वृत्तसंस्थेनेही त्यांच्या मृत्यूची नोंद केली आहे.

सर्व हालचालींचा अभ्यास

टाईम्सच्या अहवालानुसार, या कारवाईमुळे वॉशिंग्टन आणि तेल अवीव यांच्यातील गुप्तचर सहकार्याची खोली अधोरेखित झाली आहे. विशेषतः गेल्या वर्षी झालेल्या १२ दिवसांच्या संघर्षानंतर, अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेतृत्व आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) दबावाच्या परिस्थितीत कसे संवाद साधतात आणि हालचाली कशा करतात याबाबत अधिक सविस्तर माहिती गोळा केली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अनेक वरिष्ठ अधिकारी ठार

कारवाईची माहिती असलेल्या सूत्रांनुसार, पुढील हल्ल्यांमध्ये अशा ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले, जिथे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी वास्तव्यास असल्याचा अंदाज होता. इराणचा सर्वोच्च गुप्तचर अधिकारी बचावल्याचे सांगितले जात असले, तरी अनेक वरिष्ठ अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘व्हाईट हाऊस’ आणि सीआयएने या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

“बॉम्बहल्ल्यांची कारवाई सुरूच राहणार”

दरम्यान, इराणनेही प्रत्युत्तरादाखल आखाती भागात हल्ले केल्याची माहिती आहे. अबू धाबी तसेच अमेरिकन लष्करी तळांच्या परिसरात लक्ष्य साधले आहे. त्यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराची बॉम्बहल्ल्यांची कारवाई “जितकी आवश्यक असेल तितकी सुरू राहील,” असे स्पष्ट केले आहे.