Eknath Shinde Shiv sena Mumbai Political Power : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सहा बंडखोर खासदारांनी अखेर शिंदेसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये धाराशिवचे ओम राजेनिंबाळकर, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव आणि ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांसारख्या प्रभावशाली नावांचा समावेश आहे. खासदारांचा हा गट फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान खासदार संजय दिना पाटील यांचा पक्षांतराचा निर्णय मुंबईतील राजकीय समीकरणांसाठी विशेष महत्वाचा मानला जात आहे. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमधला मुंबईतील संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०२२ मध्ये एकसंध शिवसेनेचे दोन गटात विभाजन झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता. तरीही पक्षाचे नऊ खासदार आणि २० आमदार निवडून आणण्यात ठाकरेंना यश आले होते. मात्र, त्यातील सहा खासदारांनी आता शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. संजय दिना पाटील यांच्या पक्षांतराच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्षाला मुंबईत अधिकच बळकटी मिळाल्याचे दिसून येत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद आतापर्यंत प्रामुख्याने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली पट्ट्यात केंद्रित होती. याउलट मुंबई शहर हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा अभेद्य गड मानला जात होता. मात्र, ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यांनी पक्षांतर करून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाच्या पारंपरिक प्रभावक्षेत्रातही शिंदेसेनेचा प्रभाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये विशेषतः भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि मानखुर्द-शिवाजी नगर भागात संजय दिना पाटील यांचा मजबूत जनसंपर्क असून तळागाळात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यातील भांडुप हा भाग पारंपारिकपणे मराठी भाषिक मतदारांचा मुख्य गड राहिला आहे. त्यामुळे पाटील यांना आपल्या गोटात खेचून शिंदे यांनी ठाकरेंच्या तळागाळातील यंत्रणेलाच थेट सुरुंग लावला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या २५ वर्षांपासून एकसंध शिवसेनेच्या हातात असलेली महापालिकेची सत्ता ठाकरेंना गमवावी लागली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या स्थानिक प्रभावालाही मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संजय दिना पाटील यांचे पक्षांतर हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून त्याला संघटनात्मक वजनही आहे. ईशान्य मुंबईतील स्थानिक नेत्यांसह अनेक नगरसेवक विकास निधी आणि राजकीय संरक्षणासाठी विद्यमान खासदारांच्या बाजूने उभे राहतात. त्यामुळे पाटील यांच्या पक्षांतरच्या निर्णयाचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गोटातील सहा बंडखोर खासदारांनी पक्षांतर करताना वेगळीच भूमिका मांडली. विरोधी पक्षात राहिल्यामुळे आपल्या मतदारसंघातील कामे करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सत्ताधारी गटात सामील झाल्यानंतर मतदारसंघातील प्रलंबित कामे करता येईल, असा त्यांना ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी काळात या सहा लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही खासदारांच्या पावलांवर पाऊल ठेवून शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास ईशान्य मुंबईवरील ठाकरेंची पकड आणखीनच कमकुवत होऊ शकते, असा अंदाज विश्लेषकांनी बांधला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ यांच्या राजकीय रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे- त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि वारशाचा खरा वारसदार असल्याचे सिद्ध करणे हा आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभावशाली नेते आणि खासदार संजय दिना पाटील यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांना आपल्या गोटात खेचून आणल्यानंतर शिंदे यांना आपला प्रभाव केवळ मुंबईतही वाढवण्यात मदत होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाला मुंबईच्या सीमांमध्ये थेट ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आवश्यक असलेली ‘सांस्कृतिक आणि भौगोलिक वैधता’ मिळाल्याचे मानले जात आहे. या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे संसदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकूण खासदारांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खासदारांच्या बाबतीत भाजपापेक्षा शिंदे गटच मोठा भाऊ ठरल्याचे दिसून त्यांचे राजकीय वजनही वाढणार आहे.

ठाकरे गटात पडलेल्या या फुटीकडे मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या राजकीय वर्चस्वाचा मोठा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदलांचे दूरगामी परिणाम राजकीय समीकरणांवर दिसून येण्याची शक्यता आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, एप्रिल महिन्यात लोकसभेत संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक मंजूर करण्यात एनडीएला अपयश आल्यामुळे संसदेतील संख्याबळ वाढविण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित असलेले हे विधेयक आगामी संसदीय अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारला लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. शिंदेसेनेचे हे वाढलेले बळ राज्यातील ‘महायुती’ आघाडीतील अंतर्गत समीकरणे देखील बदलू शकते. शिंदेसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, विधानसभा निवडणुकीत भाजपा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर अनेकांनी एकनाथ शिंदे हे राजकीयदृष्ट्या संपल्याचे गृहीत धरले होते; पण जेव्हा लोकांना वाटते की लढाई संपली आहे, तेव्हा गेम कसा फिरवायचा हे शिंदेंनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ठाकरे गटाचे खासदार फोडून त्यांनी एनडीएमध्ये आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला आहे.