संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमधील नेते गुलाम नबी आझाद यांनी डेमाॅक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची सोमवारी स्थापना केली. जम्मू आणि काश्मिर या केंद्रशासित प्रदेशात आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडली आहे. नॅशनल काॅन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुल्ला किंवा त्यांचे पूत्र ओमर अथवा पीडीपी नेत्या मेहबुवा मुफ्की यांच्या तुलनेत आझाद यांना तेवढा जनाधार नसल्याने आझाद यांचा पक्ष कितपत प्रभावी ठरेल याविषयी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> भाजपाने केले शिंदे गटाच्या मंत्र्याला लक्ष्य !

जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री व वर्षानुवर्षे केंद्रात मंत्रीपद भूषविलेल्या गुलाम नबी आझाद यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी नवीन राजकीय डावाला सुरुवात केली. आझाद हे कश्मिरी असले तरी मुख्यमंत्रीपदाचा तीन वर्षांचा काळ सोडल्यास त्यांनी चार दशके केंद्रातच विविध पदांवर काम केले. काँग्रेस नेते म्हणून जम्मू आणि काश्मिरमध्ये पक्षाचे नेतृत्व केले. वर्षानुवर्षे केंद्रात मंत्रिपद भूषविले. मात्र मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर एकदाच ते काश्मिर खोऱ्यातून निवडून गेले. काश्मिर खोऱ्यातून ते लोकसभेवर कधीच निवडून गेले नाहीत. लोकसभेवर निवडून येण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा आधार घेतला होता. त्यानंतर ते राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले होते.

हेही वाचा >>> शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा

जम्मू आणि काश्मिरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स आणि पीडीपी हे दोन मुख्य प्रादेशिक पक्ष आहेत. कश्मिर खोऱ्यात या दोन पक्षांचा दबदबा आहे. जम्मूमध्ये भाजपने चांगले बस्तान बसविले आहे. त्यात आता आझाद यांच्या पक्षाची भर पडली आहे. आझाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांनी आझाद यांना साथ दिली. आझाद यांच्या बंडामुळे काँग्रेसचे जम्मू आणि काश्मिरमध्ये नुकसान होऊ शकते किंवा पक्ष एकदम कमकुवत होईल. पण राज्याच्या राजकारणात आझाद यांचा पक्ष निर्णायक भूमिका बजाविण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा >>> शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा

गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेत निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. मोदींनी आझाद यांचे कौतुक केले. आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यावर काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर भाजप किंवा मोदी यांच्याविरोधात राज्यसभेत विरोधी पक्षनेते असताना कधीच आक्रमक भूमिका घेतली नाही, असा सूर लावला होता.

गुलाम नबी आझाद यांची प्रतिमा भाजप किंवा मोदींच्या जवळचे अशी झाली आहे. काश्मिर खोऱ्यात ही प्रतिमा त्यांना त्रासदायक ठरू शकते. दुसरीकडे आझाद यांच्या पक्षामुळे भाजपचाच निवडणुकीत फायदा होईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. पंजाबमधील कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याप्रमाणेच आझाद हे भविष्यात आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच आझाद यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला असला तरी केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणूक राजकारणात फार काही प्रभाव पाडण्याची शक्यता कमीच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How ghulam nabi azad new party will be effective print politics news amy
First published on: 26-09-2022 at 18:18 IST