scorecardresearch

काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार?

गटबाजीने विखुरलेल्या प्रदेश काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार, असा प्रश्न काँग्रेसमधील जुन्याजाणत्यांना पडला आहे.

unity in Congress
काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यातील वादानंतर प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत सर्व नेत्यांनी उपस्थित राहून एकीचा संदेश दिला असला, तरी आधीच गटबाजीने विखुरलेल्या प्रदेश काँग्रेसमधील एकी किती काळ टिकणार, असा प्रश्न काँग्रेसमधील जुन्याजाणत्यांना पडला आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर काम करणे शक्य नाही, तसेच पक्षांतर्गत कोंडी करण्यात येत असल्याने विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहिल्यावर राज्याचे प्रभारी पाटील यांनी थोरात यांची समजूत काढली. यानंतर झालेल्या प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत थोरात आणि पटोले यांनी एकत्र येत सारे काही आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच, पक्षांतर्गत गटबाजीची चर्चा सुरू होण्यास भाजपवर खापर फोडले. थोरात यांनीच पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र प्रदेशमध्ये सध्या कोणाचा पायपूस कोणात नाही, अशी अवस्था आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीचा आशीर्वाद असल्याने ते राज्यातील कोणत्याही नेत्याला विश्वासात घेत नाहीत. राष्ट्रवादीची मंडळी तर पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. शिवसेनेच्या मुखपत्रातून पटोले यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यात आली होती.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मतभेदाची दरी

हेही वाचा – सोलापुरातील वादग्रस्त नेता भाजपच्या गळाला

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे शांत व संयमी नेते असले तरी त्यांचेही सर्व नेत्यांशी फारसे जमत नाही. अशोक चव्हाण यांचा गट वादाचा फायदा उठविण्याकरिता टपूनच बसलेला आहे. विधिमंडळ नेतेपद किंवा प्रदेशाध्यक्षपदावर चव्हाण गटाचा डोळा आहे. यापैकी विधिमंडळ पक्षनेतेपदी थोरातच कायम राहतील, असे स्पष्ट संकेतच दिल्लीने दिले आहेत. पटोले यांना पदावरून हटविण्याकरिता यशोमती ठाकूर, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आदी नेतेमंडळी टपून बसलेली आहेत. पटोले हे राज्यातील कोणत्याच नेत्याला फारशी किंमत देत नाहीत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पक्षात एकाकी पडले आहेत. त्यांचेही अशोक चव्हाण वा बाळासाहेब थोरात यांच्याशी फारसे सख्य नाही. पक्षात एकूणच आनंदी आनंद आहे. एकीचा संदेश प्रदेशच्या बैठकीतून देण्यात आला असला तरी मने एवढी विभागली गेली आहेत की एकी किती काळ टिकेल, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 12:23 IST
ताज्या बातम्या