राज्यात एकनाथ शिंदे -भाजप युतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर आता विदर्भातून मंत्रिपदावर कोणाची  वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात अंदाज बांधले  जात आहेत. फडणवीस मंत्रिमंडळातील वैदर्भीय आमदारांना पुन्हा संधी मिळणार की त्यापैकी काहींना वगळून नव्या चेहऱ्यांना मंत्री करणार याची सर्वत्र उत्सुकता आहे. 

फडणवीस सरकारमध्ये विदर्भाला घसघशीत प्रतिनिधित्व होते. अर्थ,वन, ऊर्जा, गृह या महत्वाच्या खात्यांसह १० ते १२ मंत्री-राज्यमंत्री होते.  तेवढेच प्रतिनिधित्व आताही अपेक्षित आहे.त्यावेळी मंत्रिमंडळात असलेल्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, संजय राठोड, परिणय फुके,रणजित पाटील, मदन येरावार यांच्यासह इतरांचाही समावेश होता.  यापैकी शिंदे मंत्रिमंडळात कोण असतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भाजपकडून सुधीर मुनगंटीवार,  संजय कुंटे, परिणय फुके  या जुन्या नावांसोबतच वर्ध्याचे पंकज भोयर, हिंगण्याचे समीर मेघे आदींच्या नावांची  चर्चा आहे. फुके आणि कुंटे  कट्टर फडणवीस समर्थक म्हणून ओळखले जातात ते त्यांच्या मंत्रिमंडळातही होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत संभ्रमाचे  वातावरण आहे. शिंदे यांच्यासोबत विदर्भातील सेनेचे तीन  व दोन पुरस्कृत असे पाच आमदार आहेत. यापैकी संजय राठोड हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेचे दोन पुरस्कृत आमदार अनुक्रमे आशीष जयस्वाल (रामटेक), नरेंद्र भोंडेकर (भंडारा)  यांच्यापैकी भोंडेकर यांच्या नावाचा विचार  होऊ शकतो. कारण जयस्वाल यांच्याकडे खनिकर्म महामंडळाचे अध्यक्षपद आहे. पश्चिम विदर्भातून  रायमुलकर, गायकवाड यापैकी एकाला संधी दिली जाईल,अशी चर्चा आहे.