मार्च महिन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन होऊन अवघ्या महिनाभराचा कालावधी लोटला होता. या दुर्घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी याकरिता रोहित यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करताना काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंब्याची मागणी केली. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक सुमारे तासाहून अधिक काळ चालली. शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू दिनकरराव यांचे नातू असलेले युवा नेते रोहित पवार यांनी या दौऱ्यात काँग्रेसच्या अनेक प्रभावशाली नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांना धीर देत तुमचा लढा सुरूच ठेवा, आपल्या विचारसणीची वेळ नक्कीच येईल, असा विश्वास दिल्याचे समजते.

रोहित पवार-काँग्रेस जवळीक कशी वाढली?

यादरम्यान अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात अडचणी आल्यानंतर काही दिवसांतच रोहित यांनी थेट बंगळुरू गाठले. काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात त्यांनी हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ दाखल केला. गुन्हा कुठेही घडला असला किंवा कायदेशीर अधिकारक्षेत्र कोणत्याही भागाचे असले, तरी कोणत्याही पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’ नोंदवता येतो. त्यानंतर संबंधित प्रकरण योग्य अधिकारक्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्याकडे वर्ग केले जाते. त्यावेळी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर रोहित पवार आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आले. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी काँग्रेस नेत्याच्या स्वागतासाठी रोहित यांनी संपूर्ण शहरात शेकडो पोस्टर्स लावले होते.

रोहित पवार यांचे राजकीय ध्येय काय?

या संदर्भात दी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नावातच ‘काँग्रेस’ हा शब्द असून विचारसरणीत कोणताही फरक नाही. सुरुवातीला पवार साहेब (शरद पवार) हे काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे हा पक्ष आमच्यासाठी नवीन नाही. कागदावर आम्ही वेगळे असलो, तरी गेली कित्येक दशकांपासून आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत. २०२९ मध्ये राज्यात आणि केंद्रात पुन्हा सत्तेत येणे हे सध्या दोन्ही पक्षांसमोरील सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. राहुल गांधी यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचेही रोहित यांनी सांगितले. महाराष्ट्रात आम्हाला विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित ठेवले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावशाली भूमिका मांडणारे राहुल आमचेच नेते आहेत.

राहुल गांधी यांच्याशी का होतेय तुलना?

विधानसभेतील पुरेशा संख्याबळाअभावी महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला विरोधीपक्षनेतेपदावर अधिकृत दावा करता आलेला नाही. तसेच सत्ताधारी महायुती आणि विधानसभा अध्यक्षांनी मोठ्या मनाने हे पद अद्याप कोणालाही दिलेले नाही. अशा स्थितीत रोहित पवार यांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून भाजपाप्रणीत सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात दौरे करून ते शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि कंत्राटदारांचे प्रश्न अत्यंत जोरकसपणे मांडत आहेत. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच रोहित पवार पत्रकार परिषदांमध्ये सादरीकरणाच्या माध्यमातून विविध मुद्दे मांडताना दिसून येतात. स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीचा मुद्दाही त्यांनी आक्रमकपणे उचलून धरला आहे. याच आठवड्यात त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून लक्ष्य केले. भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलकांना राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिला होता. या सर्व घडामोडींमुळे रोहित पवार यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी केली जात आहे.

रोहित काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा

काही आठवड्यांपूर्वी शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या गटात विलीन होऊन भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचवेळी अशी परिस्थिती उद्भवल्यास रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशाही चर्चांना उधाण आले होते. यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, रोहित पवार कोणत्याही प्रकारच्या अटकळींना वाव ठेवू इच्छित नाही. राजकीयदृष्ट्या अविश्वसनीय अशी प्रतिमा निर्माण होऊ नये, याची त्यांना काळजी आहे. रोहित पवार यांचे केवळ काँग्रेस वरिष्ठ नेतृत्वाशीच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही सलोख्याचे संबंध निर्माण झाल्याचे दिसून येते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या काकी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक न लढवता काँग्रेसला माघार घ्यायला लावण्यात रोहित यांना यश आले होते. रोहित पवारांची ही भूमिका त्यांची आत्या आणि बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. राज्यातील काँग्रेसच्या भूमिकेबाबत असलेल्या आपल्या नाराजीबद्दल सुप्रिया सुळे उघडपणे बोलताना दिसून येतात.

रोहित पवारांवर भाजपाचा आरोप काय?

यादरम्यान रोहित पवार हे विद्यार्थ्यांचा वापर करून आपले राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी केला आहे. तसेच रोहित यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अद्याप कोणतेही धोरणात्मक योगदान दिले नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही रोहित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असे मुळीक यांनी म्हटले. त्याचवेळी रोहित पवार यांचे समर्थक अमोल माटोले यांनी भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न उपस्थित करणे हा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न आहे, असे भाजपाला वाटत असेल, तर सत्ताधारी पक्षाची असंवेदनशील वृत्ती यातून दिसून येते. भाजपाच्या नेत्यांनी अशी बालिश वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे, असे माटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्या राजकीय प्रवासातून धडे घेतले आहेत. कोणाच्याही राजकीय पाठबळावर अवलंबून न राहता स्वतःचा स्वतंत्र राजकीय मार्ग लवकरात लवकर तयार करण्याची त्यांची इच्छा आहे. यासाठी काँग्रेसशी चांगले संबंध ठेवणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे या नेत्याने स्पष्ट केले.