मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीच्या वतीने मंगळवारी राजधानी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विरोधी पक्षांतील अनेक खासदारांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना बसमध्ये बसवून शहरातील विविध पोलीस ठाण्यात नेण्याची तयारीही सुरू केली. त्यामुळे हे आंदोलन आता संपल्यात जमा असल्याचे अनेकांना वाटत होते. त्याचवेळी आकाशवाणी भवनाजवळ एक नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्या एका अनपेक्षित कृतीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

आकाशवाणी भवनाजवळ नेमके काय घडले?

दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओचे मुख्यालय असलेल्या आकाशवाणी भवनाबाहेर पोलिसांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी बसेस उभ्या केल्या होत्या. प्रियांका गांधी वाड्रा आधीच यातील एका बसमध्ये जाऊन बसल्या होत्या; तर राहुल गांधी हेदेखील बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी दोन्ही भावंडांनी एकमेकांकडे पाहिले आणि ते पोलिसांना चकवा देऊन आकाशवाणी भवनाच्या आवारात शिरले. त्यांच्या या कृतीमुळे आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना नेमके काय करावे हेच समजले नाही. गांधी बहीण-भावंडांनी आकाशवाणी भवनात प्रवेश करताच बाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांमध्येही उत्साह संचारला. पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि पवन खेरा थेट आकाशवाणी भवनाच्या संरक्षक भिंतीवर चढले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्यापाठोपाठ खासदार इम्रान प्रतापगढी आणि युवक काँग्रेसचे नेते बी. व्ही. श्रीनिवास यांनीही भिंतीवर चढून घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे शांत होत आलेले इंडिया आघाडीचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले.

या आंदोलनाबाबत काँग्रेसचे नेते काय म्हणाले?

याबाबत काँग्रेसच्या एका खासदाराने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, बहुतांश नेत्यांना आंदोलन संपल्याचे वाटले होते; पण अचानक आकाशवाणी भवनाबाहेर नेमके काय घडले हे आम्हालाही समजले नाही. हा आमच्या मूळ नियोजनाचा भाग नव्हता. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आकाशवाणी भवनमध्ये का गेले आणि त्यांच्या मनात नेमके काय होते हे फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे. यादरम्यान गांधी बहीण-भावंडांसह काँग्रेसचे बहुतांश खासदार दुपारपर्यंत आकाशवाणी भवनाच्या आवारातच ठिय्या देऊन बसलेले होते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी या खासदारांशी चर्चा करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनबाहेर दिल्ली पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाट तैनात करण्यात आला होता. भवनच्या आवारात असलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठीच हा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

काँग्रेसच्या नेत्यांकडून गांधी बहीण-भावंडांचे कौतुक

खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या अचानक निर्णयामुळे आंदोलन संपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न हाणून पाडला गेल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला. गांधी बहीण-भावंडांनी हे पाऊल उचलले नसते, तर आंदोलन केव्हाच संपले असते, असे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवना खेरा यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “आज सकाळी इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करून आमच्या खासदारांना रोखले. सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या ऑल इंडिया रेडिओच्या आवारात ठिया आंदोलन करत आहेत,” असे खेरा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

विरोधी पक्षांतील अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एसआयआर म्हणजेच मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून मतदारांना वंचित ठेवले जात आहे. तसेच या मोहिमेचा थेट भाजपाला फायदा करून दिला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी रोखला आणि अनेक खासदारांना ताब्यात घेतले. त्यामध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना विविध बसमध्ये बसवून आंदोलन स्थळापासून दूर नेले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदानाचा हक्क आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधकांचे हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केला आहे.

विरोधकांच्या आंदोलनावर भाजपाची टीका

इंडिया आघाडीच्या या आंदोलनावर सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना टीकेचा भडिमार केला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आले. निवडणुकांमधील पराभवामुळे विरोधकांच्या मनात निराशा निर्माण झाली असल्याची टीका केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली, तर राहुल गांधी यांना कोणत्याही मार्गाने पुन्हा-पुन्हा लाँच करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याचा टोला भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेसने वेळोवेळी भारतीय सैन्यदल, सर्वोच्च न्यायालय, हिंदू समाज आणि ईव्हीएमवर शाब्दिक हल्ले केले. आता गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी थेट निवडणूक आयोगाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे, असा आरोपही संबित पात्रा यांनी केला आहे.