वसई : पालघर लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे या भागाचे माजी खासदार राजेंद्र गावित यांना सध्या राजकीय पुर्नवसनाची चिंता सतावू लागली आहे. मुळचे काँग्रेसी असलेले गावित हे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री ही राहीले होते. शिवसेनेत प्रवेश करत पालघर लोकसभेचे खासदार झालेले गावित पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. इतके सगळे केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांची उमेदवारी नाकारली गेली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पुर्नवसनाच्या प्रतिक्षेत असलेले गावित आता नवा मतदारसंघ शोधू लागले आहेत.

राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्याच्या राजकारणात मागील २० वर्षांपासून सक्रिय आहेत. गावित सुरवातीला काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री पद भूषवले होते. खासदार अँड. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर २०१८ मध्ये लोकसभेची पोट निवडणूकीत गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही निवडणूक जिंकली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघावर तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेने दावा केला. भाजपकडून ही जागा हिसकावून घेताना गावितांनाही शिवसेनेने आयात करुन घेतले. शिवसेना फुटीनंतर गावित हे शिंदे गटात सामील झाले होते. सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले गावित पुन्हा एकदा २०२४ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होते. मात्र जागावाटपाच्या गणितात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आणि पक्षाने ऐनवेळी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारून डॉ. हेमंत सवरा यांना रिंगणात उतरविले. तेव्हापासून गावित अस्वस्थ आणि नाराज आहेत. ही नाराजी दूर व्हावी यासाठी महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी गावितांची मनधरणी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यावेळी राजेंद्र गावित यांचे पुनर्वसन करून त्यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करू असे आश्वासन दिले गेल्याची चर्चा होती. मात्र हे पुर्नवसन कुठे आणि कसे केले जाणार याविषयी मात्र गावित समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

आणखी वाचा-ओबीसींच्या महाअधिवेशनात फडणवीस यांचे कौतुक; वक्त्यांकडून विविध योजनांचा उल्लेख

गावितांचे पुर्नवसन कसे करणार?

पालघर जिल्ह्यात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. बोईसर, डहाणू, विक्रमगड आणि पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. त्यापैकी एक मतदारसंघ गावितांना द्यावा असा विचार भाजपमध्ये सुरु आहे. पालघर आणि बोईसर हे गावितांसाठी सोयीस्कर मतदारसंघ मानले जातात. बोईसरमध्ये संतोष जनाठे, विलास तरे यांचा दावा आहे. पालघर मध्ये शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे गावितांसाठी यांच्यापैकी कुणाचा तरी राजकीय बळी द्यावे लागणार आहे. तसे झाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे. गावितांचे पुर्नवसन करणे आणि इतरांना न दुखावता हे गणित बसविण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे असणार आहे. गावितांच्या पुर्नवसनाची जबाबदारी सध्या तरी भाजपच्या खांद्यावर असली तरी पालघर, बोईसर या शिंदेसेनाचा दावा असलेल्या मतदारसंघाची गणितेही यामुळे बदलण्याची भीती आहे. त्यामुळे एकटया गावितांसाठी महायुतीच्या नेत्यांना बरीच कसरत करावी लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.