मधु कांबळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार टिकविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, परंतु त्यात यश आले नाही तर, विरोधात बसण्याची तयारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी पक्षाची ही भूमिका सांगितली जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेनेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. गेले चार दिवस राज्यात व राज्याबाहेर वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुुरुवारी पक्षाचे मंत्री व नेते यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून, महाविकास आघाडी सरकार टिकविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका बैठकीत मांडली गेल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. शिवसेनेच्या अंतर्गत काय घडते आहे, याची कल्पना नाही, परंतु जे आमदार मुंबई बाहेर गेले आहेत, ते परत येतील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आघाडी सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न राहील, उद्धव ठाकरे यांनाही पक्षाचा पूर्ण पाठिंबा होता व आहे, परंतु वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर, विरोधात बसण्याची पक्षाची तयारी आहे, असे पाटील यांनी सांगितले.