एरवी कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेतेमंडळी इतर पक्षांवर किंवा नेत्यांवर टीका करताना दिसत असतात. आघाडी विरुद्ध युती असा देखील संघर्ष दिसून येतो. मात्र, सध्या राज्यसभेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीवर देशातले राजकीय वातावरण तापू लागले आहे. आणि हे वातावरण पक्षापक्षांमधल्या राजकारणामुळे नसून पक्षांतर्गतच हेवेदाव्यांमुळे तापल्याचे अधिक प्रमाणात दिसत आहे. याचाच प्रत्यय काँग्रेसकडून नुकतीच ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर दिसून आला. प्रतापगढींच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त करताना मग आमचे काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

वास्तविक इम्रान प्रतापगढी हे मुळचे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आहेत. मात्र, पक्षाने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रासाठी वेगळी अशी काय भूमिका मांडू शकणार आहेत? असा देखील सवाल पक्षातल्या काही मंडळींकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी हे अवघ्या तीन वर्षांपूर्वीच काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसच्या जाहीर उमेदवारांपैकी ते सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत.

Nandurbar lok sabha 2024 election, congress, Rajni Naik, adv gopal padavi
नंदुरबारमध्ये काँग्रेस धक्क्याच्या तयारीत ? – रजनी नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चा
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना

“मी कमी पात्र होते का?” नगमा यांचा संतप्त सवाल!

इम्रान प्रतापगढी उर्फ मोहम्मद इम्रान खान यांच्या उमेदवारीमुळे अनेक ज्येष्ठांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर खोचक शब्दांत पोस्ट करताना “तपश्चर्या कमी पडली”, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अभिनेत्री नगमा यांनी खेरा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना “इम्रान भाईंसमोर आमचीही १८ वर्षांची तपश्चर्या कमी पडली. २००३-०४ मध्ये जेव्हा मी काँग्रेसमध्ये आले, तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्वत: मला राज्यसभेवर पाठवण्याचे वचन दिले होते. पण गेल्या १८ वर्षांमध्ये त्यांना तशी संधी मिळालेली नाही. इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे. मी विचारते, मी कमी पात्र होते का?” असा थेट सवाल नगमा यांनी उपस्थित केला आहे.

अवघ्या वर्षभरापूर्वीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेले इम्रान प्रतापगढी यांना कदाचित आपल्या उमेदवारीवर होणाऱ्या आक्षेपांची पुरेशी कल्पना असावी. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणतात, “काँग्रेसनं नुकत्याच उदयपूर येथे संपन्न झालेल्या चिंतन शिबिरामध्ये तरुणांना अधिकाधिक सहभागी करून घेण्याचा निकष ठरवला आहे. त्याच निकषानुसार पक्षाने माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला आहे.” पण त्यासोबतच पक्षातील संतुलनावर भाष्य करताना, “प्रत्यक्ष मैदानात असो, सामाजिक जीवनात असो किंवा मग राजकीय जीवनात असो, फक्त ज्येष्ठ किंवा फक्त तरुण निर्णय घेऊ शकत नाहीत”, असे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

महाराष्ट्रातून उमेदवारी असली, तरी उत्तर प्रदेशचा विसर नाही

पक्षानं महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली असली, तरी आपला कॅनव्हास हा संपूर्ण भारत असल्याची भूमिका इम्रान प्रतापगढी यांनी मांडली आहे. महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशचे मुद्दे देखील राज्यसभेत मांडणार असल्याचे ते म्हणाले. “मी एक वैचारिक व्यक्ती असून राहुल गांधी यांनी मला राजकारणासाठी निवडले आहे. मला पदांची कोणतीही लालसा नाही. पण जेव्हा माझ्यावर अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली, मी ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. आता राज्यसभेत पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे”, असे इम्रान खान यांनी नमूद केले आहे.

एकदा ठेच लागल्यामुळे ‘आप’चे सावध पाऊल, दोन पद्मश्री विजेत्यांना जाहीर केली राज्यसभेची उमेदवारी

कोण आहेत प्रतापगढी?

इम्रान प्रतापगढी यांची २०१६ साली उत्तर प्रदेशातील अखिलेश यादव सरकारने यश भारती पुरस्कारासाठी निवड केल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले. त्यांच्या कवितांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधतानाच समाजवादी पार्टी आणि विशेषत: आझम खान यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याचं पाहायला मिळत असे. २०१९मध्ये प्रतापगढी यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. काँग्रेसकडून त्यांना प्रियांका गांधींची सासुरवाडी अर्थात उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले. पण समाजवाजी पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. २०१९ आणि २०२०मध्ये झालेल्या शाहीन बागमधील आंदोलनात देखील ते दिसून आले होते. २०२१मध्ये त्यांच्याकडे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. अल्पावधीत त्यांना मिळालेल्या संधीमुळे तेव्हाच पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत देखील प्रतापगढी हे काँग्रेससाठी स्टार प्रचारक होते.

प्रतापगढींच्या उमेदवारीवर बोलताना काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने टिप्पणी केली आहे. “इम्रान प्रतापगढी हे एक चांगले तरुण नेते आहेत. पण आम्हाला हे कळत नाहीये की त्यांनी अशी कोणती कामगिरी केली, ज्याचं फळ म्हणून त्यांना ही उमेदवारी देण्यात आली? जर हे स्पष्ट करण्यात पक्षाला अपयश आले, तर त्यातून पक्षासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आणि अनेक विजय मिळवून दिलेल्या नेत्यांचं मनोबल खच्ची होऊ शकते. शिवाय, २०२४ च्या निवडणुकांआधी चुकीचा संदेश पक्षात जाऊ शकतो. प्रतापगढींना उमेदवारी दिल्यामुळे उत्तर प्रदेशमधील निष्ठावान काँग्रेस नेत्यांचा अपमान तर झालाच आहे. पण त्यांच्या निवडीमुळे काँग्रेसला महाराष्ट्रात असा कोणता फायदा होणार आहे?” असा थेट सवाल काँग्रेस नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.