छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी फक्त इम्तियाज जलील आणि डॉ. गफ्फार कादरी हे दोनच नेते नाहीत. काही नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी विनंती पक्षाचे सर्वेसर्वा ॲड. असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे केली होती. पण त्यांच्या मनात काही वेगळेच आहे. त्यांनी तुम्ही लढाच असे आदेश दिले आहेत असे नाही. पण पक्षाकडून सुरू असणाऱ्या उमेदवारांच्या चाचपणीसाठीच्या नावांमध्ये आपले नावही समाविष्ट असल्याचे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मान्य केले. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत, हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले.

औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढविली होती. किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल यांच्यामधील मतविभाजानामुळे ६१ हजार ८४३ मतदान घेऊन ते निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०२४ मध्ये त्यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी पराभव केला. या पराभवाच्या अनुषंगाने बोलताना खासदार जलील म्हणाले, ‘ मी जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणूनच पराभूत झालो.’ पण येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली विधानसभेची निवडणूक लढवायची की नाही, हे एमआयएमचे नेते ओवैसी ठरवतील. मी २०० टक्के अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. ओवैसी यांच्याबरोबर काम करताना एकटा माणूस काय करू शकतो, याची प्रेरणा मिळत गेली. तुमच्याबरोबर किती माणसं आहेत, हे महत्त्वाचे नसते. त्या व्यक्ती कोण आहेत, यावर सारे ठरते. त्यामुळे एमआयएम पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अलिकडेच शरद पवार यांची त्यांनी भेट घेतल्याची चर्चा होती. अशी कोणतीही भेट झाली नव्हती असे वारंवार विचारल्यावर त्यांनी सांगितले.

हेही वाचा – अजित पवार यांच्याकडून मालेगावात अल्पसंख्यांकांना आपलेसे करण्याची खेळी

इंडिया आघाडीत जाण्याची एमआयएमचीही इच्छा

महाराष्ट्राच्या राजकारणातून विचारसरणीचा अंत झाला आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील पक्ष एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसता येईल का, हेच तपासत आहे. अशा स्थितीमध्ये एमआयएम या पक्षाला अस्पृश्य समजण्याचे काही एक कारण नाही. आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा आहे. जर महाविकास आघाडीने आम्हाला सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला तर जागा वाटपाच्या बोलणीत अवाजवी मागण्या करणार नाही, असे म्हणत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे.

हेही वाचा – पालघर पट्ट्यात ठाकरे गटाची नव्याने बांधणी

३० जागांवर चाचपणी

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे, अशी विधाने आपण करणार नाही. ३० जागांवर चाचपणी सुरू आहे. यामध्ये नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगरमधील दोन मतदारसंघ, धुळे, मालेगाव, भिवंडी या जागांवर चर्चा सुरू आहे. ताकद असणाऱ्या मतदारसंघात उमेदवार उतरविण्यासाठी संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. मुंबईत यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.