लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे नगर मतदारसंघात फिरत नव्हते. पराभव त्यांना बराच जिव्हारी लागलेला दिसतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सक्रिय झाले आहेत आणि ते पुन्हा दौरे करू लागले. आपण संगमनेर व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे जाहीर करून टाकले. संगमनेर हा तर विखे यांचे परंपरागत विरोधक बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ. थोरात यांनी त्याला प्रत्युत्तर देताना, बालहट्ट पुरवण्याऐवजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच संगमनेरमधून लढावे असे निमंत्रण दिले. त्यानंतर लगेचच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघातून इच्छुक असल्याचा दावा केला. मग मतदारसंघ न राहिलेल्या सुजय विखे यांनी शिवाजी कर्डिले यांची राहुरीतील अखेरची निवडणूक असल्याचे त्यांनीच जाहीर करून टाकले. लोकसभेत पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्यानेच बहुधा सुजय विखे हे विधानसभा निवडणुकीची आगाऊ नोंदणी करीत असल्याची चर्चा सुरू झाली. राजकारणात उद्याची खात्री देता येत नाही आणि विखे पाच वर्षांनंतरचा आतापासूनच विचार करू लागले आहेत.
तसदी शपथेची
आरेवाडीच्या बिरोबा बनात यंदाही गुरुवारी दसरा मेळावा झाला. याच आरेवाडीच्या बनात २०१८ मध्ये बिरोबाच्या डाव्या व उजव्या अंगाला एकाच दिवशी दोन सवते-सवते मेळावे झाले होते. त्यावेळी लोकसभा निवडणूक तोंडावर होती. धनगर आरक्षणाचा मुद्दाही यावेळेप्रमाणेच त्यावेळीही ऐरणीवर होता. दिवस कलतीला गेला तर शेंडगेंचा मेळावा सुरू होण्याची चिन्हे माणसाअभावी सुरू झाला नाही, मात्र, या मेळाव्यातील रिकामी जागा बघून गर्दीचा लोंढा पडळकर यांच्या मेळाव्यात सहभागी झाला. त्यावेळी भाजपला मतदान करू नका अशी आण पडळकरांनी उपस्थितांना दिली, यंदाच्या दसरा मेळाव्यात मात्र, आमदार पडळकर यांनी आडवा भंडारा कपाळी लावणाऱ्यांमध्ये कोणालाही आडवे करण्याची ताकद असल्याचे सांगत शपथेची तसदी मात्र टाळली असली तरी नेहमीप्रमाणे खासदार शरद पवार यांना लक्ष्य करत माध्यमांचे लक्ष वेधण्याचा मात्र प्रयत्न आवर्जून केला.
सर्वेक्षण घरातच
आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सर्व प्रमुख राजकीय पक्षांमधील हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरू झाले आहे. इकडे सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या बाजूने फिरणाऱ्या वाऱ्यांचा अंदाज घेत महायुतीच्या नेत्यांची मुले, मुली, पुतणेही महाविकास आघाडीकडे आकृष्ट झाले आहेत. त्यांच्या मुलाखतींचे किस्से तेवढेच रंगतदार ठरले आहेत. पूर्वाश्रमीचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे आणि सध्या भाजपमध्ये दिवस मोजणारे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा मुलगा अभिजित ढोबळे आणि कन्या कोमल साळुंखे-ढोबळे या दोघांनी मोहोळ राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. अन्य इच्छुकांसह या दोन्ही भाऊ बहिणीने मुलाखत देताना विजयाबद्दल विश्वास बोलून दाखविला. त्याचा तपशील देताना दोघांनी करून घेतलेल्या सर्वेक्षणाचा हवाला दिला. प्रा. ढोबळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेचे राज्यभर जाळे आहे. त्याचे काम अर्थातच पुत्र अभिजित आणि कन्या कोमल पाहतात. हा मुद्दा हेरून मुलाखत घेणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीचे सर्वेक्षण असे आणि कोणत्या माध्यमातून केले, असे विचारले असता अभिजित व कोमल या दोन्ही भावंडांनी आपल्या संस्थेतील मनुष्यबळ वापरून सर्वेक्षण केल्याचे उत्तर दिले. पक्षश्रेष्ठींनी लगेचच दुसरा प्रश्न विचारला, सर्वेक्षणासाठी तुम्ही दोघांनी संस्था वाटून घेतली होती का? अर्थात, या प्रश्नातील खोच समजली आणि इतर इच्छुकांसह मुलाखत घेणाऱ्या पक्षश्रेष्ठींमध्ये खसखस पिकली.
(संकलन : मोहनीराज लहाडे, दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर)