नगर : नगर जिल्ह्यातील विविध नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असली तरी दिवाळी फराळाच्या निमित्ताने नेतेमंडळी एकत्र आल्याने त्याचा राजकीय अर्थ काढत जिल्ह्यात चर्चा घडू लागल्या आहेत. कोणत्या नेत्याकडे कोण उपस्थित होते, तेथे काय वक्तव्ये केली, एकाच वाहनातून प्रवास केला वगैरे यातून तर्कवितर्क काढले जाऊ लागले आहेत. दिवाळी फराळाच्या निमित्ताने राजकीय शक्तीप्रदर्शनही केले जात आहे
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपापल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साखरेचे वाटप केले. या साखर वाटपातून मतपेरणी झाल्याचा अर्थ उघडपणे काढला गेला. खरेतर खासदार सुजय विखे नगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, मात्र त्यांनी साखर वाटली ती शिर्डी मतदारसंघात. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना उपेक्षित ठेवल्याची टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पालकमंत्री असले तरी त्यांचे सर्वच प्रमुख कार्यक्रम जिल्ह्याच्या मुख्यालयाऐवजी त्यांच्या शिर्डी मतदारसंघातच आयोजित केले जातात, याची पार्श्वभूमी या टीकेला होती.
हेही वाचा : भुजबळांमागे कुणाचे ‘बळ’ ?
दिवाळी, दिवाळीचा फराळ ही खरेतर राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांसाठी जनसंपर्काची मोठी पर्वणीच ठरू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक नेते दिवाळी पाडव्याला फराळ मेळावा आयोजित करतात. माजी राज्यमंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी अनेक वर्षे ही परंपरा जपली आहे. त्यांच्या फराळ मेळाव्याला मंत्री विखे, खासदार विखे, माजी आमदार अरुण जगताप यांनी हजेरी लावली. मंत्री विखे व माजी आमदार जगताप यांनी एकामेकाशेजारी बसून केलेली चर्चा उपस्थितांच्या नजरेत भरणारी होती. दिवाळी आणि त्यानंतरचे काही दिवस श्रीरामपूर शहरातील बाजारपेठा राजकीय नेत्यांच्या शुभेच्छा पदयात्रांनी गजबजून गेल्या होत्या. काँग्रेस अंतर्गत वादाचे पडसाद त्यातूनही उमटले. आमदार लहू कानडे यांच्यासह काँग्रेसमधीलच पदाधिकाऱ्यांच्या गटातटांनी स्वतंत्र पदयात्रा काढून शुभेच्छा दिल्या. माजी आमदार व भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) नेते भानुदास मुरकुटे यांच्या पदयात्रेत सहभागी होत काँग्रेसचे सचिन गुजर यांनी श्रीरामपूरकरांना धक्का दिला.
भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे व अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी आपापल्या गावात आयोजित केलेल्या दिवाळी फराळाने जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच लज्जत निर्माण केली. हे दोघे विखे विरोधक समजले जातात. या पार्श्वभूमीवर दोघांनी एकमेकांचे तोंड भरून केलेले कौतुक वेगळेच पडसाद उमटवणारे ठरले. आमदार लंके आता महायुतीत असल्याकडे लक्षवेधत आमदार शिंदे यांनी, मी व लंके एकत्र आल्याचा काय अर्थ काढायचा तो काढा, मात्र आमची साखर कडू नाही, फराळाही गोड आहे, असे सांगत चौफेर टोलेबाजी केली. आमदार लंके यांनीही आपल्या पडत्या काळात पालकमंत्री असताना आमदार शिंदे यांनी केलेल्या मदतीची आठवण जागवली. नवरात्रात आमदार लंके यांनी आमदार शिंदे यांच्या वाहनाच्या सारथ्य करत त्यांना मोहटादेवीचे दर्शन घडवले. त्याचवेळी दोघांची राजकीय मैत्री वेगळ्या वळणावर आल्याची जाणीव जिल्ह्याला झाली होती. दिवाळी फराळाने त्यावर शिक्कमोर्तब केले. शिंदे यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या स्वागताची कमान चर्चेची ठरली.
हेही वाचा : शेखावटी प्रदेशातील जाटांचा कौल भाजपसाठी निर्णायक
आमदार शिंदे यांच्या फराळाला खासदार विखे व अजितदादा गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी एकत्रच हजेरी लावली. खासदार विखे यांनी यापूर्वीच आमदार जगताप यांना जाहीरपणे भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. आमदार जगताप यांनी अद्याप त्याला जाहीरपणे नकार दिलेला नाही. त्यांचा भाजप प्रवेश केव्हा होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. मात्र शहर भाजप त्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विखे व आमदार जगताप यांच्या एकत्रित हजेरीची चर्चा होत होती.
राम शिंदे-निलेश लंके या आमदार द्वयींच्या एकत्र येण्याला जसा विखे विरोधाचा संदर्भ होता तसाच असतो तो शरद पवार गटाचे प्रमुख शिलेदार आमदार रोहित पवारांनाही धक्का होता. आमदार रोहित पवार यांनी लगेच त्याची परतफेड करण्यासाठी भाऊबीजेला पारनेरमध्ये हजेरी लावत, आमदार लंके यांच्यापासून दुरावलेले माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना पाठबळ दिले. विजय औटे यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. आमदार लंके अजितदादा गटात सहभागी झाले असले तरी त्यांच्या सर्व कार्यक्रमातून अद्यापि शरद पवार यांचे छायाचित्र झळकवले जाते. दिवाळी फराळातही ते दिसले. दिवाळी फराळातही आमदार पवार यांनी औटी यांच्या वाहनाचे सारथ्य करत आमदार लंके यांना जाणीव करून दिली.
नागरिकांची दिवाळी संपली असली तरी राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाच्या पंगती अजूनही सुरूच आहेत. . सार्वत्रिक निवडणुका आणि सहकारातील निवडणुकांत जिल्ह्यातील नेते वेगवेगळे समीकरणे जुळवतात. लोकसभा, विधानसभा मतदारसंघात वेगळी गणिते मांडताना सहकारात पक्षांतर्गत गटातटाची वेगळी समीकरण जुळलेली असतात. राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळातूनही त्याचेच प्रतिबिंब उमटताना दिसते. एकमेकांचे विरोधक असणारे एकमेकांच्या राजकीय दिवाळी फराळाकडे पाठ फिरवतात मात्र राजकीय समीकरणे जुळणारे गट एकमेकांकडे दिवाळी फराळाला हजेरी लावताना आढळतात.