प्रबोध देशपांडे

अकोला : शरद पवार आणि अजित पवार गटांत विभागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटांत गट निर्माण झालेत. अकोल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या गटबाजीचे राजकारण पेटले आहे. पक्षांतर्गत कलहातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले जातात. नेत्यांच्या या पक्षात संघटनात्मक बांधणीवर मात्र प्रश्नचिन्ह कायमच आहेत. गेल्या काही वर्षापासून राजकारणात अस्थिर वातावरण तयार झाले. सत्तासुंदरी प्राप्त करण्यासाठी विचारधारा, पक्षनिष्ठा धाब्यावर बसवून ‘विकासा’च्या गोंडस नावावर नेतेमंडळींनी आपआपली भूमिका बदलली. राज्यात राष्ट्रवादीमध्ये ‘साहेब’ व ‘दादा’ असे दोन गट पडल्यावर जिल्ह्यातील पक्षामध्ये देखील त्याचे पडसाद उमटले.

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगोदरच गटातटाच्या राजकारणात बेजार होता. सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख. जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांची वाणवा. राज्यातील वेगवेगळ्या ‘गॉडफादर’चे बोट धरून जिल्ह्यातील नेत्यांची वाटचाल सुरू होती. वरिष्ठांनीच जाहिररित्या बंड केल्याने जिल्हा पातळीवरील नेत्यांनीही सोयीस्करपणे गट निवडले. हे गट वेगवेगळे होऊन देखील पक्षांतर्गत गटबाजी काही संपली नाही, तर आणखी वाढली आहे. अजित पवार गटाला आता पक्षाचे नाव व चिन्ह मिळाले असले तरी संघटनात्मक बांधणी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यांत आपल्या विश्वासूंना पदे बहाल केली. मात्र, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीऐवजी ते सर्वच वर्चस्वाच्या लढईतून आपसातच भिडतांना दिसून येतात.

हेही वाचा… नगरमध्ये निवडणुकीपूर्वी पाणी प्रकल्पावरून राजकीय वादाची चिन्हे

जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक गट आहेत. पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी व जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्यातील वाद काही नवीन नाही. त्यांच्यातील कलह अनेकवेळा चव्हाट्यावर आला. आमदार व जिल्हाध्यक्षांमध्ये शहकाटशहाचे राजकारण रंगत असते. त्यातच शिवसेना शिंदे गटातील संदीप पाटील यांनी आ.मिटकरींच्या मध्यस्थीने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा वाद आणखी पेटला. कार्यकर्त्यांच्या बैठकीवरून अंधारे आणि पाटील यांच्यात ‘लेटरवॉर’ चालले. यानिमित्ताने पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली. या अगोदर शिवा मोहोड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यावरून आमदार मिटकरींनी संताप व्यक्त करीत राजीनाम्याचा इशारा दिला होता.

बाळापूर मतदारसंघ हा कळीचा मुद्दा आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची भर पडली. त्यातूनच मतभेदाच्या दरीत आणखी वाढ झाली आहे. जिल्ह्यात अजित पवार गटातील इतरही नेत्यांचे स्वतंत्र गट आहेत. पक्षाला जिल्ह्यात नव्याने बांधणी करण्याची गरज आहे. मात्र, त्या दृष्टीने कुठलाही नेता सक्रिय दिसत नाही. आपसातील उणीदुणी काढण्यातच नेते व पदाधिकारी व्यस्त राहत असल्याने पक्षाला संघटनात्मक बळ कसे मिळणार? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा… जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी

चित्र अस्पष्ट अन् विधानसभा विजयाच्या वल्गना

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची भूमिका, जागा वाटप आदी कुठलेही चित्र स्पष्ट नसतांना आमदार अमोल मिटकरींनी बाळापुरातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणू, अशी वल्गना देखील करून टाकली. या अगोदर मिटकरींनी भाजपचे खासदार संजय धोत्रेंवर टीकास्त्र सोडून अकोल्यातून लोकसभा लढण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली होती. मात्र, काही महिन्यातच अजित पवार भाजपसोबत गेल्यावर मिटकरी देखील सत्तेच्या वाटेवर गेले. निवडणुकीत युती धर्म पाळावा लागणार असल्याने त्यांना आता भाजप उमेदवाराच्या प्रचारात उतरावे लागेल.

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून स्वगृही परतलो. गटबाजीचा विषय नाही, कार्यक्रमांना जिल्हाध्यक्षांना देखील निमंत्रित केले होते. मात्र, त्यांनीच कार्यकर्त्यांची बैठक घेण्यास विरोध दर्शवला. पक्षाच्या शाखा उघडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्याचा अहवाल पक्षांच्या वरिष्ठांकडे सादर केला जाईल. – संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अकोला.