अलिबाग- कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढविणारे सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूकी दरम्यान त्यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. बुधवारी कर्जत येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करून त्यांनी पक्षकार्याची सुरवात केली.
विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात वाद झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा सांगितला होता. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटालाच दिली गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांच्यासह कर्जत मधील पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिले. घारे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेले. अटीतटीच्या लढतीत महेंद्र थोरवे निवडून आले. बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या सुधाकर घारे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली. तर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.
निवडणूकीतील या बंडखोरीचे महायुतीवर विपरित परिणाम झाले. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या वादाला याच बंडखोरीची किनार होती. आता मात्र बंडखोरी करणारे सुधाकर घारे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पुन्हा सक्रीय झाले आहेत. निवडणूकीपूर्वी त्यांनी दिलेला पक्ष सदस्यत्वाचा आणि पदाचा राजिनामा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नामंजूर केला आहे. यानंतर त्यांनी बुधवारी संध्याकाळी कर्जत येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार आहे.
काही दिवसांपूर्वी महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून लढवणाऱ्या स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्ष प्रवेशानंतर गोगावले यांनी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसनी स्नेहल जगताप यांना मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून जगताप याचा पक्षप्रवेश करून घेण्यात आल्याचे म्हटले होते. आता सुधाकर घारे यांनी निवडणूकीपूर्वी दिलेला राजीनामा पाच महिन्यानी नामंजूर करण्यात आल्याने, राजकीय वर्तूळात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. निवडणूकीच्या राजकारणाचा पट हळुहळू उलगडू लागला आहे.