अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्‍या भाजपच्‍या उमेदवारीला विरोध करून प्रहार जनशक्‍ती पक्षाने निवडणूक रिंगणात उडी घेण्‍याचा निर्णय घेतला असला, तरी ‘प्रहार’च्‍या समावेशामुळे मतविभागणीचा फायदा भाजप की काँग्रेसला होणार हा प्रश्‍न चर्चेत आला आहे. अमरावती मतदार संघातून काँग्रेसने सर्वप्रथम बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर केली. नवनीत राणांना भाजपची उमेदवारी मिळाली. पण, महायुतीचे घटक असलेल्‍या ‘प्रहार’चे आमदार बच्‍चू कडू यांनी नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला उघड विरोध केला. त्‍यापुढे जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना ‘प्रहार’ची उमेदवारी बहाल केली. एकीकडे, महायुतीसाठी ही बंडखोरी ठरली, त्‍याचवेळी महाविकास आघाडीतूनही बंडाचा झेंडा फडकला. बच्‍चू कडू हे सध्‍यातरी महायुतीत आहेत. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्‍यांग मंत्रालयाचा शब्‍द दिला होता, म्‍हणून आपण गुवाहाटीला गेलो होतो, असे ते सांगतात. भाजपशी अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत असल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे आहे. पण, एकाच वेळी अनेकांना वेठीस धरणारे ‘प्रहार’चे हे राजकारण बच्‍चू कडू यांना कोणता लाभ मिळवून देणार, हा प्रश्‍न अनुत्‍तरीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती जिल्‍ह्यात आमदार रवी राणा आणि बच्‍चू कडू या दोन नेत्‍यांनी गेल्‍या दोन दशकांत स्‍वतंत्र अस्तित्‍व निर्माण केले. रवी राणांचा युवा स्‍वाभिमान पक्ष हा फारशी कामगिरी करू शकला नाही, पण त्‍यांच्‍या पत्‍नी नवनीत राणा या खासदार बनल्‍या. त्‍यामुळे संपूर्ण जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर पकड निर्माण करण्‍याची त्‍यांची महत्‍वाकांक्षा उफाळून आली. त्‍यातूनच बच्‍चू कडूंसह अनेक नेत्‍यांशी रवी राणांनी वैर पत्‍करले. रवी राणा आणि बच्‍चू कडू महायुतीत असले, तरी दोघांमधील वितुष्‍ट सर्वश्रृत आहे.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी

नवनीत राणा यांना पराभूत करणे हेच आपले लक्ष्‍य असल्‍याचे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे असले, तरी त्‍यांची व्‍यूहरचना काय असेल, याचा अंदाज अद्याप अनेकांना आलेला नाही. बच्‍चू कडू यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिनेश बुब यांना ‘प्रहार’ची उमेदवारी दिल्‍याने महाविकास आघाडीसमोरही संकट निर्माण झाले आहे. ‘प्रहार’चे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दिनेश बुब यांच्‍याशी चर्चा केली आणि त्‍यांच्‍या उपस्थितीतच बुब यांनी प्रहारमध्‍ये प्रवेश घेतला. यावेळी बच्‍चू कडू यांची अनुपस्थिती अनेकांना खटकणारी ठरली. महायुतीत राहून केवळ अमरावतीपुरती मैत्रिपूर्ण लढत ही राणा यांना धडा शिकवण्‍यासाठी आहे, की महाविकास आघाडीला नुकसान पोहचविण्‍यासाठी आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा : हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी इच्छूकांची ‘मातोश्री’वर धाव

अमरावती मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होण्‍याआधी २००४ मध्‍ये बच्‍चू कडूंनी निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे अनंत गुढे, रिपाइंचे रा.सु.गवई आणि बच्‍चू कडू यांच्‍यात तिरंगी लढत झाली होती. अनंत गुढे यांनी त्‍यावेळी बच्‍चू कडू यांचा अवघ्‍या १४ हजार २३४ मतांनी पराभव केला होता. बच्‍चू कडू यांचे लोकसभेत पोहचण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण होऊ शकले नाही, पण ‘प्रहार’चा एखादा खासदार असावा, ही त्‍यांची अपेक्षा आहे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बदलत्‍या राजकीय परिस्थितीत विश्‍वासार्हता टिकवून ठेवण्‍याचे आव्‍हान बच्‍चू कडू यांच्‍यासमोर असणार आहे.

यावेळी जातीय समीकरणे प्रभावी ठरणार आहेत. हिंदू मतांच्‍या ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्‍न राहणार आहे. निवडणुकीत बहुसंख्‍य कुणबी समुदायाची मते निर्णायक ठरू शकतील. अशा स्थितीत नवनीत राणा यांच्‍या मार्गातील अडथळे बच्‍चू कडू वाढवणार की, त्‍यांचा मार्ग प्रशस्‍त करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati lok sabha bachchu kadu gives his candidate against navneet rana and congress print politics news css
First published on: 30-03-2024 at 13:31 IST