ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पुर्व आणि पालघर जिल्ह्यातील पालघर आणि बोईसर या जागा महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्या असून या जागांवर शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. असे असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेने भिवंडी पुर्व मतदार संघातील काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. तर, बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावीत या भाजपच्या दोन्ही नेत्यांना पक्षात घेण्याच्या हालचाली शिंदेच्या सेनेकडून सुरू आहेत. यामुळे ठाणे आणि पालघरात शिंदे सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर असल्याचे चित्र दिसून येते.
राज्याची विधानसभा निवडणुक जाहीर होताच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मतदार संघांची जागा मिळाली नाही म्हणून अनेक इच्छूक नाराज झाले आहेत. तर, काही ठिकाणी पक्षाला जागा मिळूनही त्याठिकाणी उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छूक नाराज आहेत. यातूनच नाराज झालेल्या इच्छूकांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन वेगळी चुल मांडण्यास सुरूवात केली आहे. काहींनी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळते का यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर, मतदार संघात प्रभाव असलेल्या इच्छूकांना हेरून त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची रणनिती राजकीय पक्षांकडून आखली जात आहे. यातूनच आयारामांचे महत्व वाढले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पुर्व आणि पालघर जिल्ह्यातील पालघर आणि बोईसर या जागा महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्या असून या जागांवर शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. असे असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेने भिवंडी पुर्व मतदार संघातील काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. २०१४ मध्ये संतोष शेट्टी यांनी भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी त्यांचा ३ हजार ३९३ मतांनी पराभव केला होता. २०१९ साली शेट्टी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी शिवसेनेचे उमेदवार रुपेश म्हात्रे यांचा १ हजार ३१४ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत रईस यांना ४५ हजार ५३७ तर, रुपेश म्हात्रे यांना ४४ हजार २२३ मते मिळाली होती. शेट्टी यांना तिसऱ्या क्रमांकाची ३२ हजार १९८ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना किंवा समाजवादी पक्षाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेट्टी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हे ही वाचा… हितेंद्र ठाकूर एकाकी, महाविकास आघाडीची दारे बंद
पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ मध्ये बहुजन विकास आघाडीच्या तिकीटावर निवडणुक लढवून आमदार झालेले विलास तरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता २०१९ मध्ये ते शिंदेच्या शिवसेनेतून निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असून त्यासाठी त्यांच्या शिंदेच्या सेनेत पक्ष प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावीत हे सुद्धा भाजपमधून शिंदेच्या सेनेत पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही नेत्यांचा पक्ष प्रवेशही निश्चित झाला होता. मात्र, तो काही कारणामुळे पुढे गेल्याचे समजते. यामुळे ठाणे आणि पालघरात शिंदे सेनेची भिस्त आयात उमेदवारांवर असल्याचे चित्र दिसून येते.