छत्रपती संभाजीनगर : आष्टी मतदारसंघातील कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पातील कुटेफळ सिंचन प्रकल्पाच्या भूमीपूजनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत मराठवाड्याची दुष्काळमुक्ती केली जाईल, अशी घोषणा केली. गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत असणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरी त्यांना सोडणार नाही, असे जाहीर सभेत सांगितल्याने दाेन महिन्यापासून या प्रकरणात ‘ आवाज’ बनलेल्या आमदार सुरेश धस यांचे बळ मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा वाढविल्याचे चित्र निर्माण झाले. या कार्यक्रमास पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते. धनंजय मुंडे यांची मात्र कार्यक्रमास उपस्थिती नव्हती.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने सुरेश धस यांनी राख, वाळूमधील गैरव्यवहार करुन गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. ‘दिवार’ चित्रपटातील ‘ मेरे पास मॉ है’ या गाजलेल्या संवादफेकीची आठवण करुन देत ‘ मेरे पास देवेंद्र फडणवीस का आर्शीवाद है’ असे वाक्य उच्चारुन सुरेश धस यांनी गेल्या दोन महिन्यातील वक्तव्याचा पुनरुच्चार केला. फक्त आका आणि आकांचा आका हे दोन शब्द त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर म्हटली नाहीत. पण वाळू, राख तसेच विमा प्रकरणातील आरोप करणाऱ्या धस गेल्या दोन महिन्यापासून परळी विधानसभा मतदारसंघातील अनेक गैरप्रकारांचे तपशील माध्यमांपर्यंत पोहचवत होते. त्यामुळे आमदार धस यांना कोणाचा पाठिंबा याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र ‘ मेरे पास देवेंद्र फडणवीस का आर्शीवाद है ’ या वक्तव्याच्या अर्थ गेल्या दोन महिन्यातील वक्तव्याशी जाेडून पाहिले जात आहे.

मराठवाडा दुष्काळमुक्ती पुन्हा घोषणा

धाराशिव जिल्ह्यातील काही भाग कृष्णा खोऱ्यात येत असल्याने सुरुवातील २३ टीएमसी पाणी देण्याची घोषणा करण्यात आली. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री म्हणून या विषयाची संचिका आपल्यासमोर आली तेव्हा त्यातील पाणी केवळ कागदावरच असल्याचे दिसून आले. कृष्णा पाणी तंटा लवाद आणि अन्य कारणामुळे सात टीएमसी पाणी देण्याचा प्रकल्प धाराशिव व बीड जिल्ह्यासाठी घेण्यात आला. या प्रकल्पातील सिंचन सुविधा कुटेफळ प्रकल्पात करण्यात आली. त्यामुळे पुढील काळात सुरेश धस यांना पुढील काळात आधुनिक भगीरथ म्हणून संबोधावे लागेल असा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

धस यांचा ‘दिवार ’आणि पंकजा मुंडे यांचा ‘बाहुबली’

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मराठवाड्यातील नेत्यांनी दोन चित्रपटतील वक्तव्ये केली. एक होता ‘दिवार’ आणि दुसरा ‘बाहुबली’. या दोन्ही चित्रपटातील पात्रही बीडच्या नेत्यांनी वाटून घेतले. ‘ मेरे पास देवेंद्र फडणवीस का अशीर्वाद है’ असे म्हणत दिवार मधील शशीकपूरचे पात्र आपण वठवत असल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. त्यांच्या या संवादफेकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळया वाजवल्या. याच व्यासपीठावर ‘ बाहुबली’ चित्रपटातील ‘ बाहुबली’ म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील तर मला ‘ शिवगामी ’ असे म्हणावे लागेल. कारण मीही ‘ मेरा वचन ही मेरा शासन’ असे मी म्हणते. सुरेश यांना मीही निवडून आणण्याचे वचन दिले हाेते. मी गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे. त्यामुळे मागे एक पुढे एक करणाऱ्यापैकी नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. चित्रपटातील पात्रांचा आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी कौतुक केले. पण बाहुबलीचा उल्लेख रा. स्व. संघाच्या पठडीत काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना ओशाळायला लावणारा असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In beed politics devendra fadnavis supporting suresh dhas print politics news asj