अलिबाग– शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद भरत गोगावले यांच्या महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मताधिक्य घटले आहे. गोगावलेचा प्रभाव असेलल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना जेमतेम तीन हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोगावले यांच्यासाठी ही धोक्याची सूचना असल्याचे दिसून येत आहे.

महाड पोलादूर हा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आणि पर्यायाने भरत गोगावले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग तीन वेळा या मतदारसंघातून गोगावले चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहेत. मात्र तरीही या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात गोगावले यांचा नेहमीचा प्रभाव दिसून आला नाही. मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ७७ हजार ८७७ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते ७४ हजार ६२६ मते पडली. म्हणजेच तटकरेंना या मतदारसंघातून जेमतेम ३ हजार २५१ मताधिक्य मिळाले.

हेही वाचा – वाळव्यात जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम

गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीते यांना साडेसात हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तर विधानसभा निवडणुकीत गोगावले यांना जळपास २० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत गोगावले यांची मतदारसंघातील पकड सैल होत असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या तीन महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे गोगावले यांच्यासाठी ही धोक्याची पूर्वसूचना असणार आहे.

मतदारसंघात मुस्लिम मतांचे झालेले ध्रुवीकरण आणि मुंबईकर मतदारांनी मतदानाकडे फिरवलेली पाठ, पक्षफुटीमुळे शिवसेनेच्या मतांचे झालेले विभाजन, याशिवाय शिवसेना उबाठा गटाच्या स्नेहल जगताप यांचा मतदारसंघातील वाढता प्रभाव या कारणामुळे लोकसभेत महाड मतदारसंघात महायुतीला अपेक्षित मतदान झाले नाही. याशिवाय गोगावले यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याची भावना गोगावले यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात सलत होती. याचा एकत्रित परिणाम निवडणुकीत मतदारसंघातील निकालावर झाला. त्यामुळे लोकसभेचा निकाल हा गोगावले यांच्यासाठी धोक्याची पूर्व सूचना देणारा निकाल असणार आहे.

हेही वाचा – नाशिक मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील समीकरणे बदलणार ?

पक्षात बंडखोरी केल्याची नाराजी आणि स्नेहल जगताप यांच्या माध्यमातून मिळालेला शिवसेना उबाठा गटाला मिळालेला पर्याय आगामी काळात गोगावले यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान मतदारसंघातून महायुतीला अपेक्षित मते मिळाली नाही. निकालात आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून योग्य ती पावले उचलू, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी माध्यमांना दिली आहे.