प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रा नुकतीच विदर्भातून मध्य प्रदेशमध्ये दाखल झाली. या यात्रेला पश्चिम विदर्भात स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळाला. यात्रेने पश्चिम विदर्भातून मार्गक्रमण केले असले तरी त्यात काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांचेच वर्चस्व दिसून आले. वाशीम, अकोला बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते गटबाजीतच व्यस्त असल्याने यात्रेसाठी कार्यकर्त्यांची इतर जिल्ह्यातून जुळवाजुळव करण्यात आली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी यात्रेपासून दुरावाच ठेवल्याचे चित्र होते. यानिमित्ताने वऱ्हाडातील काँग्रेसची दैनावस्था व येथील नेत्यांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

हेही वाचा… महाविकास आघाडीचा विद्यापीठ निवडणुकीत पराभव का?

पश्चिम विदर्भातील वाशीम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आठ दिवस होती. या दरम्यान त्यांनी शेगाव येथे मोठी जाहीर सभा देखील झाली. राहुल गांधींच्या संपूर्ण यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रेमध्ये प्रतिष्ठित विचारवंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्याविषयी जनतेमध्ये आकर्षण असल्याचे दिसून आले. त्यामुळे यात्रेमध्ये प्रचंड गर्दी उसळत होती. आता या यात्रेचा काँग्रेस पक्षाला किती लाभ होणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. भारत जोडो यात्रा गेलेल्या विदर्भातील तीन जिल्ह्यांपैकी वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. अकोला जिल्ह्यात २००४ पासून काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. या भागात काँग्रेस रसातळाला गेलेला आहे. यात्रेची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आ. नितीन राऊत यांच्यावर होती. या नेत्यांनी यात्रेसाठी आपली संपूर्ण ताकद लावली. राहुल गांधी यांच्यासमोर पक्षाची कमकुवत बाजू समोर येऊ नये म्हणून वरिष्ठ नेत्यांनी आपआपल्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची आयात केली होती. अकोला जिल्ह्यात कमकुवत काँग्रेस पक्ष व गटातटात विभागलेल्या नेत्यांमुळे यात्रेला फटका बसण्याचा अंदाज प्रदेश नेत्यांना आला. त्यामुळे आ. प्रणिती शिंदे यांनी थेट सोलापूरवरून आपले सुमारे सहा हजार कार्यकर्ते अकोला जिल्ह्यात आणले होते. याशिवाय आ.विश्वजीत कदम यांचे देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते. पश्चिम विदर्भातून गेलेल्या खा.राहुल गांधींच्या यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणण्याची वेळ काँग्रेस नेत्यांवर आली होती. यात्रेच्यानिमित्ताने काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा गांधी घराण्यातील खा. राहुल गांधी यांचे पश्चिम विदर्भात वास्तव्य असतांनाही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली गटबाजीची परंपरा काही मोडीत काढली नाही, हे विशेष.

हेही वाचा… तेजस्वी बारब्दे : ग्रामविकासाचा ध्यास

केवळ राहुल गांधींसोबत छायाचित्राची धडपड

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची फक्त खा. राहुल गांधींसोबत छायाचित्र काढण्याची धडपड दिसून आली. पश्चिम विदर्भातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर काँग्रेस कुठेही एकसंघ दिसला नाही. नेते आपआपल्या गटातटात विभागले होते. यात्रेच्या प्रतिसादासाठी देखील त्यांचे प्रयत्न नव्हते. अनेक स्थानिक नेते तर राहुल गांधींची भेट घेऊन छायाचित्र काढल्यानंतर यात्रेतून गायब झाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bharat jodo yatra dominance of western maharashtra in vidarbha congress political leaders are busy in factionalism print politics news asj
First published on: 25-11-2022 at 12:25 IST