बदलापूरः मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव आणि सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या विजयानंतर मतदारसंघात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याच नावाची अधिक चर्चा रंगली होती. कथोरे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या अनेक समर्थकांनी कथोरे यांचा किंगमेकर म्हणून उल्लेख करत समाज माध्यमांवर स्टेटस, छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे विजय सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा झाला असला तरी चर्चा कथोरेंचीच अशी स्थिती होती.

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणुकीचे अनेक अनपेक्षित निकाल समोर आले. राज्यात विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यात ठाणे जिल्ह्यातील एकमेव मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांचाही समावेश होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघात पाटील यांच्या विजयासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिमेत सभा घेतली होती. त्याचवेळी समोर लढत देणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे आणि अपक्ष निलेश सांबरे असे दोन प्रमुख उमेदवार होते. विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा पाटील यांच्या पथ्यावर पडेल, अशी आशा होती. त्यामुळे कपिल पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता.

हेही वाचा – प्रवाहाच्या विरोधात जाण्याची परंपरा यंदाही रायगडमध्ये कायम

भिवंडी लोकसभेत यंदा मतदानही चांगले झाले. मात्र भिवंडी तालुक्यात विक्रमी मतदान झाले. त्यानंतरही पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलताना विजयाचे गणित मांडले होेते. मात्र निकालाच्या काही दिवस आधी कपिल पाटील यांनी विरोधात काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा देत अप्रत्यक्ष मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांना लक्ष्य केले. तर मतमोजणीच्या आदल्या दिवशी भाजपचे मोठे नेते असलेल्या जगन्नाथ पाटील यांनी किसन कथोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे कपिल पाटील यांच्या विजयाबाबत दबक्या आवाजात साशंकता व्यक्त होऊ लागली होती.

निकालाच्या दिवशी सुरुवातीच्या काही फेऱ्यांतील आघाडी वगळता कपिल पाटील आघाडी घेऊ शकले नाहीत. तर बाळ्यामामा म्हात्रे यांनी शेवटपर्यंत आघाडी टिकवून ठेवली. अखेर बाळ्यमामा म्हात्रे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. या दरम्यान विजयाची चाहूल लागताच मुरबाड विधानसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात अनेकांनी किसन कथोरे यांचे छायाचित्र आणि किंगमेकर असा मजकूर समाज माध्यमांवर प्रसारीत करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक कथोरे समर्थकांनी जाहीरपणे कथोरे यांच्या नावाने किंगमेकर म्हणून पोस्ट केल्या. त्यामुळे कपिल पाटील यांचा पराभव आणि बाळ्यामामा म्हात्रे यांच्या विजयापेक्षा कथोरे यांच्याच नावाची चर्चा मतदारसंघात रंगल्याचे चित्र होते.

हेही वाचा – मुंबईत आवाज ठाकरेंचा !

कथोरे – पाटील वाद पण प्रचारात एकत्र, तरीही….

कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानतंर पाटील यांनी सर्वप्रथम आमदार किसन कथोरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कथोरे यांच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत संपूर्ण भाजप एकत्र असल्याचे दाखवून दिले होते. कथोरे यांच्या कार्यलयातून पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू होता. ऐन प्रचार भरात असताना कथोरे यांनी स्वत एक पत्र मतदारसंघात वाटत मतदानाचे आवाहन केले होते. तर कथोरे यांनी विविध ठिकाणी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र त्यानंतरही अचानक कथोरे यांनी विरोधी उमेदवाराचा प्रचार केल्याच्या पाटील यांच्या आरोपाने भाजपात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले.