प्रशांत देशमुख

जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्याचा दत्ता मेघेंसह सर्वच नेत्यांचा निर्धार पूर्णत्वाच्या दिशेने जात असतांना काँग्रेस नेते मात्र चुकांपासून शिकायला तयार नसल्याची ताजी घडामोड आहे. प्रदेश कार्यकारिणीवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आलेल्यांमध्ये गणगोत, कंत्राटदार, खाजगी मदतनीस यांचा वरचष्मा दिसून येतो. त्यातच दलित, मुस्लिम व आदिवासी समाजाचा एकही प्रतिनिधी घेण्यात न आल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. असलेल्या प्रतिनिधींमध्ये नव्यांची भर ‘निवडणूक’ घेऊन टाकण्यात आली. १९ सप्टेंबरला मुंबईत या प्रतिनिधींची बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी, प्रांताध्यक्ष व विधिमंडळ नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

प्रतिनिधींच्या निवडीवरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष प्रभाराव यांच्या कुटूंबातील कन्या चारूलता टोकस, भाचे आमदार रणजीत कांबळे व मनोज वसू या तिघांचा समावेश यामध्ये आहे. आ. कांबळे यांचे खाजगी मदतनीस (पीए) म्हणून जिल्ह्यात ओळखले जाणारे सुनील वासू तसेच अन्य विश्वासू मनिष गंगमवार यांचाही समावेश काँग्रेस नेत्यांमध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्या या गणगोत मंडळीवर नेतेपदाची वस्त्रे पांघरण्यात आली आहेत. त्यावर पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

घराणेशाहीचा शाप काँग्रेसला यापूर्वी भोवल्याचा इतिहास आहे. गणगोतांचे राजकारण होत आहे म्हणून अनेकांनी काँग्रेस सोडून भाजपच्या विचारांना जवळ केले. या काँ ग्रेसत्यागी मंडळींच्या मदतीने भाजपचा आलेख उंचावला. जिल्ह्यात भाजपचा खासदार, तीन विधानसभेचे व एक विधानपरिषदेचा आमदार व मावळत्या कार्यकाळात जिल्हा परिषद तसेच सर्व सहा पालिकांवर भाजपचा झेंडा फडकला. काँ ग्रेसचा गड देवळीचा बुरूज वगळता सारे काही उध्वस्त झाले. पण तरीही ये रे माझ्या मागल्या, सुरूच असल्याचे ताजे चित्र आहे. प्रदेश प्रतिनिधी म्हणून अमर काळे, अरुण बाजारे, टिकाराम चौधरी, शेखर शेंडे, डॉ.शिरीश गोडे, सुनील बासू, रणजीत कांबळे, मनोज वसू, अजय बाळसराफ, अशोक शिंदे, चारूलता टोकस, शैलेश अग्रवाल, प्रेमजी पालीवाल, मनीष गंगमवार व अमित गांवडे यांचा समावेश झाला. भाजपमधून आलेले डॉ.गाेडे व सेनेचे शिंदे हीच दोन नावे नवी आहेत. गणगोत गाडा काँ ग्रेसला कसा पुढे नेणार, असा निष्ठावंतांचा सवाल आहे. अन्य एक माेठी खदखद वाढते आहे. काँ ग्रेस नेहमी दलित, मुस्लिम, आदिवासी या घटकांना ‘आपले’ मानत आली आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये या समुदायाचे काँ ग्रेसतर्फे अनेक प्रतिनिधी निवडून आले. पण संघटनेत त्यांना वाव कां नाही, असा प्रश्न जिल्हा काँ ग्रेसचे माजी पदाधिकारी व माजी नगरसेवक ईक्राम हुसेन यांनी केला. जिल्ह्यातून प्रदेश समितीवर या घटकांचा प्रतिनिधी घेण्याची आवश्यकता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र ही बाब पक्षासाठी महत्वाची नसल्याचे खेदपूर्वक म्हणावे लागत असल्याचे हुसेन म्हणाले.