पक्षांतंर्गत हाणामारीने शिस्तप्रिय भाजपला हादरा

भाजपमधील गटबाजीने थेट हाणामारीपर्यंत मजल मारली आहे.

Dhule
भाजपाला गटबाजीचा फटका

संतोष मासोळे

महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता असतानाही बहुतेक वेळा सभागृहात भाजपच्या सदस्यांनी रखडलेल्या विकास कामांच्या मुद्यावरुन घरचा आहेर देत महापौरांसह प्रशासनालाही धारेवर धरल्याची उदाहरणे धुळेकरांनी पाहिली असताना शिस्तप्रिय म्हणवल्या जाणाऱ्या भाजपमधील गटबाजीने थेट हाणामारीपर्यंत मजल मारल्याचे साक्री येथे दिसून आले. नगर पंचायतीतील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम संपताच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने विरोधकांना आयतेच कोलित मिळाले आहे.

काय घडले-बिघडले?

७४ सदस्यांच्या धुळे महापालिकेत भाजपचेच ५० सदस्य आहेत. त्यातही वेगवेगळ्या पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या मंडळींची संख्या अधिक असल्याने या सर्वांना सांभाळण्यासाठी भाजपला कसरत करावी लागत आहे. अनेकांना पालिकेतील वेगवेगळ्या पदांची आश्वासने देण्यात आली होती. त्यापैकी काहींना आश्वासनपूर्ती झाल्याने पदे मिळाली. परंतु, नाराजांच्या संख्येत अधिक वाढ होत गेली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांसह अन्य महत्त्वाच्या समिती सदस्यपदांसाठी आश्वासने दिली असताना वरिष्ठांकडून ऐनवेळी भलत्यालाच संधी देण्यात येऊ लागल्याने पक्षात वादाचा-संघर्षाचा संसर्ग सुरू झाला. आपल्यावरील अन्याय काहींनी जाहीरपणे व्यक्त केल्याने पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला. नाराजांची नाराजी दूर करताना महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हे मेटाकुटीस आले आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांपेक्षा पक्षातंर्गत वाद अधिक त्रासदायक होऊ लागले आहेत. धुळे महापालिकेतील पक्षातंर्गत वाद-विवाद कमी की काय म्हणून साक्रीत पुढचे पाऊल टाकले गेले. अनुप अग्रवाल यांच्या कुशल नियोजनामुळे नगर पंचायतीत भाजपने प्रथमच बहुमताने सत्ता मिळवली. याचे निमित्त साधत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील संभाव्य उमेदवार धनराज विसपुते यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम विश्रामगृहात ठेवला होता. कार्यक्रम संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. ती थेट हाणामारीपर्यंत गेली. हाणामारीचे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेल्याने आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने पक्षाची नाचक्की झाली. या वादामागे नगरपंचायत निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद निवडणूक, समाज माध्यमातील संदेश अशा कारणांचा संबंध असल्याचे म्हटले जात असले तरी त्यामुळे साक्रीत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपमध्ये हाणामारी होत असेल तर, हे पालिकेचा कारभार कसा हाकणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात येऊ लागला आहे. 

संभाव्य राजकीय परिणाम

धुळे महापालिका असो किंवा साक्री नगरपंचायत. दोन्ही ठिकाणी प्रचंड बहुमताने सत्ता मिळविलेल्या भाजपसाठी पक्षातंर्गत मतभेद, हाणामारी डोकेदुखी ठरू शकते. भाजपमध्ये सत्ता पचविण्यासाठीचा संयम दिसत नसल्याची टीका होऊ लागली आहे. भाजपच्या स्थानिक राजकारणावर पुढील काळात या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In dhule district bjp is facing internal disputes between local party workers and leaders pkd

Next Story
ईडीच्या रडारवर आलेले परब हे तिसरे मंत्री; उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय रडारवर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी