धुळे : श्रेयवाद आणि शक्ती प्रदर्शन यावरच सध्या शहरातील शिवसेना शिंदे गट सक्रिय असून पक्षांतर्गत चढाओढीच्या स्पर्धेत सामान्य कार्यकर्ते आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पक्ष एकसंघ नसेल तर विधानसभा निवडणुकीत शहरातील जागेवर दावा कसा करता येईल, याची चिंता वरिष्ठांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळ्यात शिंदे गट मनोज मोरे आणि सतीश महाले या दोन जिल्हाप्रमुखांच्या गटात विभागला गेला आहे. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मुशीत तयार झालेल्या या दोघांनी त्यांचे बोट धरूनच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थीदशेत भलेही दोघांमध्ये संघटन कौशल्य होते. परंतु, मोठ्या राजकीय पटलावर वर्चस्वासाठी त्यांना प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मदतीची गरज महत्वाची वाटली. त्यामुळे दोघांनीही आपापल्या पद्धतीने राजकीय मांड बसविली. विशेष म्हणजे, महापालिकेची पहिली निवडणूक दोघांनीही आपल्या स्वतःच्या रहिवास भागात नव्हे तर, अन्य प्रभागातून लढवून विजय प्राप्त केला होता. दोघांनाही महापालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. अशी दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गोटात मोरे-महाले ही जोडी डेरेदाखल झाली. इथून खरा दोघांमध्ये ‘कोण मोठा ? ‘ यासाठी संघर्ष सुरु झाला. राजकीय हेवेदावे सुरु झाले. पक्षश्रेष्ठींना दोघांमधील संघटन कौशल्याची जाणीव असल्याने कुणालाही गमवायचे नव्हते. त्यामुळे दोघांना समांतर अशी जिल्हा प्रमुखांची दोन पदे निर्माण करून पक्षवाढीची जबाबदारी सोपविण्यात आली. पैकी मनोज मोरे पेठ विभागाचे तर, सतीश महाले देवपूर विभागाचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मोरे-महाले या जोडीत एकोपा दिसणे गरजेचे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा वगळता खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्या दौऱ्यात दोघे एकत्रित दिसले नाहीत. महाले यांनी मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या रक्तदान शिबिरावेळी मोरे नव्हते. तसेच मोरे यांनी थाटलेल्या पहिल्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाला महाले अनुपस्थित होते. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाला. असे असतानाही शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित किंवा त्यांचे पती जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित, सतीश महाले यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. यावरून शिंदे गटातील संघर्षाची बाहेरील नेते, पदाधिकाऱ्यांना जाणीव झाली.

हेही वाचा : TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

शिंदे गट स्वतंत्र झाल्यावर आयोजित पहिल्या दसरा मेळाव्यासही मोरे, महाले हे एकत्र गेले नाहीत. दोघांनीही वेगवेगळे शक्ती प्रदर्शन करुन कार्यकर्त्यांना मुंबईला नेले. भाजप हा शिंदे गटाचा मित्रपक्ष असल्याने महाले हे भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. दुसरीकडे, मोरे हे मात्र भाजपविरोधात पत्रकबाजी करतात, असे चित्र आहे. अशा या गटातटाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याची जबाबदारी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तरीही मोरे आणि महाले हे रघुवंशी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना एकत्र उपस्थित राहणे टाळत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन, दोन संपर्क कार्यालये मोरे, महाले यांनी थाटली आहेत. एकाच पक्षात राहून सवतासभा मांडणाऱ्या या दोन स्थानिक पदाधिकाऱ्यांना आवरण्याचे आव्हान रघुवंशी यांच्यासमोर आहे.

आमच्यात गटबाजी नाही. धुळे विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारीसाठी दावेदार आहे. मलाच उमेदवारी मिळणार. असे झाल्यास सतीश महाले हेही माझ्याबरोबर असतील. पक्षादेशापेक्षा मी मोठा नाही. पक्ष सांगेल तसे काम करणार.

मनोज मोरे (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट, धुळे)

मी शहरात एकनाथ शिंदे यांचे फलक लावताच काही जणांनी ते फाडले होते. मी २०१४ आणि २०१९ मध्येही उमेदवारीसाठी इच्छुक होतो. शेवटच्या टप्प्यात तिकीट कापले गेले. यामुळे यंदा उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी आहे.

सतीश महाले (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट, धुळे)

हेही वाचा : नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

शिवसेना शिंदे गटात मनोज मोरे आणि सतीश महाले हे दोन गट आहेत. यामुळे पक्षात नव्याने प्रवेशही थांबले आहेत. महाले आणि मोरे यांच्यात वाद असेल तर पक्षात आम्ही येऊन काय करू, असे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांचे म्हणणे आहे. दोघेही धुळे शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. निवडून येण्याची क्षमता पाहूनच पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल. बाहेरून उमेदवार दिला गेल्यास आश्चर्य वाटू नये. खासदार श्रीकांत शिंदे दौऱ्यावर आले असताना मोरे आणि महाले यांना फलकबाजी करताना शिवसेनेचे दोन गट दिसू नयेत, असे बजावले होते. संबंधित कार्यक्रमाला आपण दोघांना एका व्यासपीठावर आणले होते.

चंद्रकांत रघुवंशी (धुळे विधानसभा प्रभारी, शिवसेना शिंदे गट)
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule eknath shinde s shivsena split into manoj more and satish mahale faction s ahead of assembly election print politics news css
Show comments