मुंबई: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघात अखेर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. डाव्या पक्षांच्या मेळाव्यात हमखास दिसणारा लाल बावटा जीवा पांडू गावित यांच्या पुढाकाराने झालेल्या मेळाव्यात अजिबात दिसला नाही हे विशेष.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट लोकसभेच्या दहा जागा लढवत आहे. महाविकास आघाडीने छोट्या घटक पक्षांना राज्यात एकही जागा सोडलेली नाही. तरीसुद्धा माकपने हिंगोली येथे उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेतला होता.

कळवण आणि सुरगाणा या विधानसभा मतदारसंघातून सात वेळा आमदार राहिलेले माकपचे ज्येष्ठ नेते जीवा पांडू गावित यांचा दिंडोरी लढवण्याचा हट्ट कायम होता. दिंडोरी येथे शुक्रवारी गावित यांच्या ३० हजार समर्थकांचा मेळावा झाला. आश्चर्य म्हणजे या मेळाव्यात एकही लाल झेंडा नव्हता.

गावित यांनी यापूर्वी दिंडोरी लोकसभा चार वेळा लढवली आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी एक लाख सात हजार मते घेतली होती. मागच्या दोन वर्षात गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई असे तीन -तीन लाख शेतकऱ्यांचे दोन ‘लॉंग मार्च’ निघाले. त्याचा लाभ या निवडणुकीत होईल, असा गावित यांचा दावा आहे.

हेही वाचा… गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?

१० एप्रिल रोजी माकपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत माकपच्या सचिव मंडळ सदस्यांनी दिंडोरी न लढवण्याची भूमिका मांडली. त्या भूमिकेला विरोध करत गावित या बैठकीतून तावातावाने निघून गेले होते. दिंडोरीत झालेल्या गावित समर्थकांच्या मेळाव्याला माकपचे राज्य सचिव उदय नारकर आणि सचिव मंडळ सदस्य डी. एल. कराड उपस्थित होते. गावित समर्थकांचा आक्रमक पवित्रा पाहून या दोघा नेत्यांनी पक्ष दिंडोरीतून उमेदवारी दाखल करेल, असे जाहीर केले.

दिंडोरीची उमेदवारी ३ मे पर्यंत दाखल करण्यास अवधी आहे. येथील भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांच्या विरोधात जनमत आहे. कांदा निर्यात बंदीमुळे येथील मतदार केंद्र सरकारवर नाराज आहेत. आघाडीच्या नेत्यांनी विनवण्या केल्या तरी आपण उमेदवारी दाखल करणारच, असे जीवा पांडू गावित यांनी सांगितले.