गोंदिया: जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि विनोद अग्रवाल, संजय पुराम, विजय रहांगडाले या भाजपच्या तिन्ही आमदारांना धक्का बसला.
गोंदिया, तिरोडा, गोरेगाव आणि सालेकसा या चारही ठिकाणी मित्रपक्षांनी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविली. परिणामी, मतविभाजन झाले. तिरोडा नगरपालिका वगळता, इतर तीनही ठिकाणी भाजप व मित्रपक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले. तीनही ठिकाणी भाजपचे आमदार असूनही काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेसने चारपैकी तीन नगराध्यक्ष निवडून आणत सत्ताधारी भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना पराभवाची धूळ चारली.
चारही ठिकाणी नगराध्यक्षपदांसह एकूण १०२ जागांसाठी ४६५ उमेदवार रिंगणात होते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना या प्रमुख पक्षांमध्येच लढत झाली. चारही ठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे असल्याने त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काँग्रेसचे माजी आमदार व स्थानिक नेत्यांनी सूक्ष्म नियोजन करून पुनरागमन केले.
निवडणुकीकरिता भाजपने सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा दिला, तर काँग्रेसने मित्रपक्षांना विश्वासात घेत निवडणुकीत रणनीती आखली. ती निकालानंतर यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले. गोंदिया नगरपालिकेवर भाजपची सत्ता असल्याने आणि भाजपचेच अग्रवाल विद्यमान आमदार असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. उमेदवारी जाहीर करण्यावरून नाराजी आणि पक्षांतर्गत धुसफूस दूर करण्यात त्यांना अपयश आले. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते डॉ. प्रशांत कटरे यांनी बंडखोरी करीत ऐनवेळी शिंदेसेनेकडून निवडणूक लढविली. यामुळे भाजपच्या मतांचे विभाजन झाले. त्याचा फटका भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार कशिश जयस्वाल यांना बसला.
काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा ‘कमबॅक’ केले.
शिंदेसेनेला भोपळा
गोंदिया नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेने प्रथमच ३५ जागा लढविल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी ऐनवेळी भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. प्रशांत कटरे यांना संधी दिली. कटरे यांच्या उमेदवारीने शिंदेसेनेला मतविभाजन करण्यात यश आले. मात्र, एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे शिंदेसेना फारशी प्रभावी ठरली नाही.
राष्ट्रवादीचे संख्याबळ पूर्वीपेक्षा कमी
खासदार पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. महायुती करून निवडणूक लढावी, अशी त्यांची इच्छा होती. पण ऐनवेळी समीकरण न जुळल्याने राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविली. यात त्यांना पाच जागा जिंकता आल्या. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक निवडून आले होते. गेल्यावेळेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटले.
